शेतकऱ्यांनी फिरविली पाठ : कारखान्यांचा नियोजनशून्य कारभारसासरा : सासरा व परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धानशेतीला तसेच अन्य बागायती शेतीला फाटा देवून मोठ्या उत्सुकतेने ऊस शेतीची निवड केली. सन २०११-१२ ला देव्हाडा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना नानाविध प्रलोभने देवून ऊस शेती करायला भाग पाडले. त्यासाठी नियोजनाप्रमाणे ऊस तोडणी, उचलणी व बिलींग योग्य वेळेत पार पाडले. कारखान्याची नियोजनबद्धता व तत्परता विचारात घेवून सासरा व परिसरातील शेतकऱ्यांनी सन २०१२-१३ या गाळप हंगामात सानगडी केंद्रात १३४ हेक्टर शेतजमीनीत २१५ शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. एकट्या सासरा गावात ११८ शेतकऱ्यांनी एकूण ६० हेक्टर जमिनीत लागवड केली होती. यापैकी आक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रति टन १०० रूपये देऊ केले. या गाळप हंगामात देव्हाडा साखर कारखान्याच्या नियोजनशून्य कारभाराचा शेतकऱ्यांना प्रत्यय आला. हळूहळू शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरवायला सुरू केली.सन २०१२-१३ मध्ये जाहीर केलेले अतिरिक्त प्रती टन १०० रूपये अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. याच कालावधीत लाखांदूर येथे साखर कारखाना सुरू झाला. देव्हाडा येथे प्रतिटन १७०० रूपये तर लाखांदूर येथे प्रतिटन १८०० रूपये भाव अद्यापही देण्यात येत आहे. पहिल्यावर्षी लाखांदूर कारखान्यानेही ऊस तोडणी, उचल व बिलींग वेळेत दिले पण आज दोन्ही कारखान्याचे चित्र उलट झाल्याचे दिसत आहे. या कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे मजूरांवर नियंत्रण नसल्याने कारखान्याकडून मिळणाऱ्या प्रतीटन तोडणी खर्चा व्यतिरिक्त मजूर वर्गाने प्रतीटन २०० ते ४०० रूपयेपर्यंत जादा दर घेऊन शेतकऱ्यांची लूट केली आहे. याविषयी अनेकदा तक्रार करूनही शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लूटीची दखल घेण्यात न आल्याने तसेच कारखान्यात बिघाड आहे, गाड्याखाली नाहीत, असे नानाविध कारणे पुढे करून शेतकऱ्यांचा तोडलेला ऊस १५ ते २० दिवस पाडून ठेवण्याचाही अनुभव शेतकऱ्यांना आला. परिणामी शेतकऱ्यांनी ऊसशेतीकडे पाठ फिरवली.ऊसशेती करत असतानी शेतकऱ्यांना बराच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना या चार वर्षाच्या काळात कोणत्याही प्रकारचा गोड अनुभव आला नसल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. अजूनही साखर कारखान्याच्या प्रशासकीय यंत्रणेत नियोजनशून्यता आढळून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरवून पारंपरिक धानशेती व बागायती शेतीचीच निवड केल्याचे दिसून येत आहे. परिणामी सासरा व परिसरात ऊस क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. (वार्ताहर)
सासरा परिसरात ऊस क्षेत्रात घट
By admin | Updated: April 8, 2015 00:50 IST