डेंग्यूने घेतला बळी : झिरोबा येथील घटना, गावात हळहळलाखांदूर : तालुक्यातील झिरोबा येथील एका दाम्पत्याला डेंग्यू आजाराची लागण झाली. यात पत्नीचा मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान अल्पावधीतच पतीचाही मृत्यू झाला. मनाबाई नामदेव देसाई (५०) व पती नामदेव अशी मृतांची नावे आहेत. झिरोबा येथील मनाबाई नामदेव देसाई (५०) व पती नामदेव यांना डेंग्यूची लागण झाली होती. मिनाबाईचा १८ सप्टेंबरला डेंग्यूने मृत्यू झाला होता. तर पती नामदेव यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मागील दहा दिवसांपासून नामदेव हे मृत्यूशी झुंज देत होते. अखेर दहा दिवसानंतर डेंग्यू या आजाराशी असलेली त्यांची झुंज संपली अन् त्यांना मृत्यूने कवटाळले. डेंग्यू आजाराने पती, पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र डेंग्यूमुळे पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू आजाराने तालुक्यात थैमान घातले असताना आरोग्य विभागाने अद्याप ठोस पावले उचलली नसल्या कारणाने दररोज खासगी व ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल होत आहेत. डेंग्यू आजाराच्या उपचाराकरिता लागणारा खर्च जास्त असल्याने तो पलवत नसल्याने अनेक ग्रामस्थ शासकीय आरोग्य सुविधांची आस धरून आहेत. यात त्यांची प्रकृती खालावत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात डेंग्यू आजाराच्या तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा नाही. सोबतच उपचारासाठी लागणारे साहित्य नाही. त्यामुळे खासगी प्रयोगशाळेत केवळ डेंग्यू आहे किंवा नाही या संबंधाने तपासणी करण्यापलीकडे ग्रामीणांना पर्याय उरला नाही. आर्थिक बाब पुढे येत असल्याने रूग्ण खासगी रुग्णालयाकडे धाव घेत नाही. सद्यस्थितीत खासगी व शासकीय रुग्णालयात शेकडो डेंग्यूचे रुग्ण उपचाराकरिता भरती आहेत. यात शाळकरी मुलांपासून वयोवृद्धापर्यंत रुग्णांचा समावेश आहे. मृतक नामदेवला एक मुलगा व दोन मुली आहेत. आरोग्य विभाग तथा ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलून आरोग्यासंदर्भात जनजागृती व फवारणी न केल्यास डेंग्यूने मृत्यूची संख्या झपाट्याने वाढणार अशी भिती व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने त्वरीत दखल घेऊन तालुक्यतील अनेक गावांमध्ये आरोग्य शिबीर लावावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू
By admin | Updated: September 29, 2014 00:37 IST