भंडारा : जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असून, सलग तिसऱ्यादिवशीही जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ सात असून, तीन तालुक्यात तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या निरंक आहे.
जिल्ह्यात १ जुलैपासून दररोज एक किंवा दोन रुग्ण आढळून येत आहेत. गत १२ दिवसांत सहा दिवस रुग्णांची संख्या शून्य आली आहे. १२ दिवसांत केवळ नऊ रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी जिल्ह्यात ११७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात जिल्ह्यात कुठेही पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, तर एक व्यक्ती कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात सध्या सात ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात तुमसर १, पवनी १, लाखनी २, साकोली ३ रुग्णांचा समावेश आहे. लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.
भंडारा तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण निरंक
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद भंडारा तालुक्यात करण्यात आली आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात २४ हजार ७४६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या. त्यापैकी ५१७ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर २४ हजार २२९ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच ॲक्टिव्ह रुग्णसंख्या निरंक आहे.