डासांचा प्रादुर्भाव : समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : शहरातील विविध समस्यांबाबत जनतेच्या समस्या निराकरणासाठी शहर काँग्रेस कमिटीने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना मच्छरदानी भेट देऊन समस्यांचा पाढा वाचला.भंडारा शहरात डासांचा प्रकोप वाढला असून मलेरिया, चिकनगुणीया व डेंग्यू यासारख्या विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. दवाखान्यांमध्ये गर्दी आहे. त्यावर उपाय योजनेची आवश्यकता आहे. शहरामध्ये मच्छरांचा नायनाट करण्यासाठी फॉगींग मशिन, डीटीटी फवारणी करण्यात यावी. पावसामुळे शहरातील खड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भंडारा शहरामध्ये अनेक ठिकाणी मोकाट जनावरे फिरत असतात. बेवारस, कुत्र्यांचा हैदोस आहे. त्यावर प्रतिबंध लावण्यात यावा. छोटा बाजार, मोठा बाजार येथे महिला प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष सचिन घनमारे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, अनु. जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अजय गडकरी, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.विनोद भोयर, पर्यावरण सेलचे अध्यक्ष अभिजीत वंजारी, युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रसन्ना चकोले, महिला शहर अध्यक्ष भावना शेंडे, जिल्हा महासचिव मनोज बागडे, नगरसेवक पृथ्वीराज तांडेकर, धर्मेंद्र गणवीर, नवाब शेख, नाहिद परवेज, उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
मुख्याधिकाऱ्यांना काँग्रेसने दिली मच्छरदानी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2016 01:20 IST