गोंडपिंपरी : महाराष्ट्र व आंध्रप्रदेश (तेलंगाणा) या दोन राज्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या वर्धा नदीवर आंध्रप्रदेश सरकारकडून डॉ. बी.आर. आंबेडकर चेवेला धरणाच्या निर्मितीचे कार्य जोमात सुरू आहे. या धरणामुळे राज्य सिमेच्या पलिकडील तेलंगाणा राज्याचा बहुतांश भाग ओलिताखाली येणार असला तरी महाराष्ट्र राज्य सिमेवर वसलेल्या बहुतांश खेड्यांना या धरणापासून क्षती पोहचण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंंत्र्यांना करार रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले तर भाजपाकडून तेलंंगाणा अधिकाऱ्यांना सर्व्हे बंदी करण्यात आली आहे. दोन राज्याच्या सीमेवरुन बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीचे पात्र अफाट आहे. याचे तंत्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करुन पूर्वीच्या आंध्रप्रदेश सरकारने वर्धा नदीवर कोट्यवधी रुपये खर्चातून धरण बांधण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केला. या प्रस्तावानुसार राज्य शासनाने बाधित होणाऱ्या गावांचा कुठलाही विचार न करता आंध्रप्रदेश सरकारशी करार केल्याचा आरोप नदीकाठावरील आसपासच्या गावकऱ्यांनी केला असून चेवेला धरणाविरोधात आजवर भाजपाच्या नेतृत्त्वात आंदोलने उभारली. त्यानंतर आंध्रप्रदेश राज्याचे विभाजन होताच क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन संभाव्य क्षती पोहचणाऱ्या गावांच्या बचावासाठी पुढाकार घेऊन आंध्रप्रदेश सरकारशी केलेला करार रद्द करून तेलंगाणा सरकारला धरण बांधकामासाठी परवानगी नाकारावी, अशी मागणी केली आहे. तर क्षेत्राच्या समस्यांसाठी आपण जनतेच्या मागणीनुसार चेवेला विरोधात संघर्ष करण्याची भूमिका देखील आ. धोटे यांनी स्पष्ट केली आहे.तत्पूर्वी चेवेला धरण निर्मिती कार्याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सिमेचे सर्व्हेक्षण करून येथील तहसीलदार कार्यालयाला भेट दिली. याच दरम्यान भाजपाचे माजी जि.प. उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य संदीप करपे यांनी त्याचवेळी तहसील कार्यालय गाठून आंध्रप्रदेश (तेलंगाणा) राज्यातून दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. परराज्यातून महाराष्ट्रात दाखल घेऊन येथील क्षती पोहोचू शकणाऱ्या गावांच्या समस्या आपल्या शासनाकडे मांडून चेवेला धरणाबाबतचा महाराष्ट्र राज्य सीमेवरचे सर्वेक्षण बंद करण्याबाबतही अधिकाऱ्यांना बजावले. एका राज्याच्या फायद्यासाठी दुसऱ्या राज्यावर अन्याय करणे ही गंंभीर बाब असून क्षेत्रातील जनतेसाठी आपण रस्त्यावरही उतरु असा इशारा संदीप करपे यांनी दिला आहे.एकंदरीत क्षेत्रातील जनतेच्या हाकेवर धारुन सदर दोन्ही लोकप्रतिनिधींनी चेवेला विरोधात कंबर कसली आहे. (तालुका प्रतिनिधी)
चेवेला धरण विरोधात लोकप्रतिनिधींचा संघर्ष
By admin | Updated: July 3, 2014 23:24 IST