प्रशांत देसाई भंडारामहिला म्हटलं की, हेवे-दावे, चुगली करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यामुळे अनेकांची मने तुटतात. मात्र, महिलांनी विचार केल्यास समाजात मोठ्या परिवर्तनाची नांदी येवू शकते. याचा प्रत्यय गणेशपुर येथील महिलांनी घडवून आणलेल्या सामूहिक ‘मकरसंक्रांत’ कार्यक्रमातून बघायला मिळाला.संक्रांतीला महिलांचे जत्थे ‘वाण’ घेण्यासाठी घराबाहेर पडतात. सुमारे १५ दिवस सायंकाळच्या सुमारास महिलांसह छोटी मुलेही वॉर्डावॉर्डात फिरताना आढळतात. अशा या महत्वाच्या संक्रांतीच्या सणातून महिलांनी एकोप्याचे दर्शन घडवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. महिलांनी हळदी-कुंकूचा राबविलेली सामूहिक कार्यक्रमाची चळवळ खरोखरच आदर्श ठरली आहे.गणेशपूर हे भंडारा शहरालगतची ग्रामपंचायत. येथील राजेंद्र वॉर्डात सहकार वसाहत आहे. येथील ३५ कुटुंबातील महिला गुण्यागोविंद्याने एकच घरा असल्यासारख्या वागतात. त्यांच्या या एकोप्यातून मागील तीन वर्षापूर्वी त्यांनी गणपती मंदिरात एकत्र येवून मकरसंक्रांतीचा कार्यक्रम सामूहिक साजरा करण्याचा संकल्प केला. या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण प्रत्येक महिलेने त्यात सहभाग घेतला. वसाहतीतील महिलांनी घेतलेल्या निर्णयाला कुटुंब प्रमुखांनीही प्रोत्साहन देत आर्थिक पाठबळ दिले. कार्यक्रमाच्या आखणीसाठी महिलांनी वेगवेगळी कमिटी बनवून सर्वांना कामाची जबाबदारी देण्यात आली. महिलांच्या या नवोपक्रमाची दखल अन्य वॉर्डातील महिलांनी घेवून समाजात वाढत चाललेल्या भेदभावाच्या भिंती तोडण्यासाठी आदर्श ठरू शकते.‘एक वसाहत एक वाण’यातील प्रत्येक महिला सर्वांच्या घरी न जाता मंदिर परिसरात होणाऱ्या सामूहिक कार्यक्रमाला हजेरी लावतात व तिथेच वाणांचे एकमेकींना आदान-प्रदान केले जाते. ‘एक वसाहत एक वाण’ हा प्रकार समाजासाठी नवीन असला तरी, त्यातून या महिलांनी दिलेला एकोप्याचा संदेश महत्त्वाचा आहे. हा आदर्श खरोखरचं समाजासाठी नवा पायंडा घालणारा आहे.सासू-सुनेचा सत्कार व बाळांची लूटवसाहतीतील महिलांनी प्रत्येक घरातील सासू व सुनेचा सत्कार करण्याचा नवोपक्रम राबविला आहे. सासुच्या इच्छेनुसार तर सुनेला नियोजनानुसार गृहोपयोगी वस्तू भेट दिली जाते. या कार्यक्रमात ज्यांच्या घरी छोटे बाळ आहेत अशांची ‘लूट’ करण्यात येते. यावर्षी चार महिने ते साडेतीन वर्षाच्या बाळांची लूट करण्यात आली. मनोरंजन व भोजनाची मेजवानीवसाहतीने राबविलेल्या या उपक्रमात सर्वांचे मनोरंजन व्हावे, यासाठी मनोरंजनात्मक खेळ व स्वरूची भोजनाची मेजवानी असते. बालगोपाल, महिला व वृध्दांपर्यंत सर्वच यात सहभागी होतात. विजेत्यांना बक्षिस देवून गौरविण्यात येते. यावर्षीच्या विजेत्यांमध्ये महिला गटात शिल्पा बांते तर वृद्ध महिला गटात रेखा देशकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
सामूहिक ‘मकरसंक्रांत’ ठरली एकोप्याची चळवळ
By admin | Updated: January 21, 2016 00:55 IST