१४ वित्त आयोगाच्या निधीची अफरातफर : रविंद्र तिडके यांची अधिकाऱ्यांना तक्रारकरडी (पालोरा) : सन २०१६-१७ आर्थिक वर्षात कोका ग्रामपंचायतीला १४ वित्त आयोगातून ७ लाख रुपयांचा निधीतून ग्रामपंचायतीने गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले. मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी योजनेतून पैसे कमविण्याच्या नादात गैरप्रकार केला आहे. अंदाजपत्रकानुसार कामे झालेली नाहीत. कामे अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य रविंद्र तिडके गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी वर्गाला दिलेल्या निवेदनातून केला आहे.कोका गावातील १४ वित्त आयोगातील निधीतून पाणीपुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आली. मात्र अंदाजपत्रकांना मुठमाती देत मनमर्जीने कामे करण्यात आली. पाईप लाईन जमिनीत ३ फुटापेक्षा अधिक खोलीवर टाकणे आवश्यक असतांना फक्त १ फुट नाली खोदून पाईप बुजविण्यात आले. सिंटेक्स ठेवण्यासाठी ९ फुट स्टँडपोस्ट उभारण्यात आले. मात्र सिमेंट पोलचे बांधकाम निकृष्टदर्जाचे करण्यात आले आहे. सिमेंट, लोहा, बद्रीचे प्रमाण अल्प ठेवून रेतीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. पाण्याची सिंटेक्स ५ हजार लिटर क्षमतेची असून भाराने स्टँडपोल पडून वित्त व मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात टाकण्यात आलेली पाईप लाईन वरच असल्याने जडवाहनामुळे फुटण्याची शक्यता आहे. कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आलेला आहे.कोका गावात यापूर्वी करोडो रुपयांच्या निधीतून पाणी पुरवठा तयार करण्यात आलेली आहे. ढिवरवाडा वैनगंगा नदीमधून कोका गावाला पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करता यावा म्हणूनही जुन्या टाकीवर पाईप लाईन करण्यात आलेली आहे. तरी सुध्दा गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध होवू शकलेले नाही. आता नव्या योजनेमध्ये सुध्दा ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित यंत्रणेच्या संगनमतामुळे ही योजनाही अपयशी ठरण्याच्या मार्गावर आहे. प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी ग्रामपंचायत सदस्य रविंद्र तिडके, रविंद्र गजभिये व सुनिल हातझाडे यांनी अधिकाऱ्यांना लेखी निवेदनातून केली आहे. मात्र अजुनही अधिकारी वर्गाने प्रकरणी चौकशी केलेली नाही. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. याप्रकरणाकडे अनेकांचे लक्ष आहे. (वार्ताहर)टेंडरिंग टाळण्यासाठी एकाच कामाचे दोन अंदाजपत्रकेग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांनी एका जवळच्या ठेकेदाराला कामे मिळावित व टेंडरिंग टाळून भष्ट्राचार करता यावा, यासाठी एकाच कामाचे दोन अंदाजपत्रके तयार करविले. संबंधित अभियंत्यांना त्यांना साथ दिली. त्यानुसार २,४१,३४३ रुपयांचा एका कामाला ५ मार्च २०१६ तर दुसऱ्या २,७३,७६५ रुपयांचा कामाला १६ मे रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली. एकूण ५,१५,१४० रुपयांच्या कामांना टेंडरिंग टाळण्यासाठी हा उपद्रव्याप करण्यात आला. मर्जीतील ठेकेदाराला कामे देण्यात आली.निविदा उघण्याआधीच कामाला सुरुवातकामाची निविदा २६ मे २०१६ रोजी ग्रामपंचायत मासिक मिटींगच्या दिवशी तीन निविदा उघण्यात आल्या. ग्रामपंचायतीच्या आवकजावक रजिस्टरमध्ये या निविदांची तारीखवार नोंद करण्यात आलेली नाही. ठेकेदाराने मात्र कामाला सुरुवात २० मे रोजी म्हणजेच निविदा उघडण्याआधीच केली. एका टाकीच्या कॉलमचे बांधकाम पूर्ण झाले होते. नाल्यांचे खोदकाम करुन पाईप लाईन बुजविण्यात आलेली होती. करारनामा व कामाचे वर्क आॅर्डरही मिळालेले नव्हते. ठेकेदाराने अगोदरच पाण्याच्या तीन सिंटेक्स गावात आणल्या होत्या. यावरुन ठेकेदार, सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामसेवक यांच पुर्वनियोजन आपसात संगनमत होते, हे सिध्द होते. यासंबंधाने सरपंच नरवर टेकाम यांचेशी संपर्क साधला असता, मोबाईल स्विच आॅफ आढळून आला.
कोका पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 00:43 IST