वरठी : सनफ्लॅग कंपनीतील कामगारांचा दिवाळी बोनस सानुग्रह अनुदानाचा रखडलेला प्रश्न सोडविण्यात संघटनेला यश आले आहे. दिवाळीपूर्वी सर्व कामगारांना त्यांच्या पगारश्रेणीनुसार २३ हजार ५०० रुपयाचा बोनस देण्यात येणार आहे.यामुळे संघटनेने पुकारलेले संप मागे घेण्यात आल्याची माहिती सनफ्लॅग आयर्न एन्ड स्टील मजदूर सभाचे कार्यकारी अध्यक्ष मिलिंद वासनिक यांनी दिली.सनफ्लॅग आयर्न अॅन्ड स्टिल कंपनीत २१०० कामगार कार्यरत आहेत. यात ९०० स्थायी व १२०० कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. कार्यरत कामगारांना दर तीन वर्षांनी पगारवाढ व दिवाळीपूर्वी बोनस देण्यात येते. पगारवाढ व सानुग्रहराशी संबंधात तीन वर्षापूर्वी झालेला करार संपुष् टात आला होता. यामुळे नियमित पगारवाढ व दिवाळी बोनस या संदर्भात पाच महिन्यापासून सनफ्लॅग व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात चर्चा सुरु होती. १७ तारखेला नागपूर येथे व्यवस्थापक कंपनीचे मालक भारद्वाज, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. गुप्ता, महाप्रबंधक प्रभाकर कोल्तेवार, सहमहाप्रबंधक सतीश श्रीवास्तव व संघटनेचे सरचिटणीस मिलिंद देशपांडे, कार्यकारी अध्यक्ष मिलिंद वासनिक, महासचिव किशोर मारवाडे, उपाध्यक्ष विजय बांडेबुचे, विजेंद्र नेमा, महेश बर्वेकर, विकास फुके, रविंद्र बोरकर, संघटन सचिव अमोद डाकरे, ज्ञानेश्वर वंजारी, रमेश बालपांडे, मारवाडे, धर्मदाय यादव, शिवकुमार सार्वे, कंत्राटी कामगार संघाचे महोम्मद जावेद, मनोहर डोंगरे, संतोष बालपांडे, शैलेंद्र बन्सोड, तारीकराम रामटेके, अम्रृत साखरवाडे, सर्वनदास चिपळूनकर व रविंद्र मिश्रा यांच्यात बैठक झाली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाने कंपनीला झालेले नुकसान याबाबत माहिती दिली.उच्च न्यायालयाच्या निर्णयाने कंपनीचे कोळसा खाण रद्द झाले. यामुळे कंपनी व्यवस्थापनाला करोडो रुपयाचे नुकसान झाले. यामुळे कामगारांना एकाकी पगारवाढ व बोनस देणे शक्य नाही. तात्पुरता दिवाळी पूर्वी बोनस म्हणून गतवेळेपेक्षा १००० रुपये वाढ करून दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पगारवाढ संबंधात चर्चा सुरु राहुन लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी हमी सनफ्लॅग कंपनीच्या व्यवस्थापन कामगार संघटनेला दिली आहे. त्यामुळे सनफ्लॅग आयर्न एन्ड स्टील मजदूर सभेच्या वतीने पुकारलेला संप तात्पुरता मागे घेतला आहे. (वार्ताहर)
सनफ्लॅग कंपनीतील संप टळला
By admin | Updated: October 21, 2014 22:47 IST