राजकुमार बडोले यांचे आवाहन : बारव्हा येथे भीमोत्सव व सत्कार सोहळाबारव्हा : सर्वसामान्य बहुजनांना केंद्रबिंदू ठरवून बाबासाहेबांनी आपल्या देशाला संविधान आणि बुद्ध धम्म दिला. त्यांची योग्यरितीने जपणूक करा, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त गुरुवारी, आयोजित बारव्हा येथील भिमोत्सव व सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. मेञ्ञा मैत्री संघ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बारव्हा, चिचाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आचार्य संदेश भालेकर होते. यावेळी भंते संघरत्न माणके, बबन लव्हात्रे, साहित्यिक तु.का. कोचे यांच्यासह साहित्यिक, विचारवंत आदी उपस्थित होते. भाऊसाहेब लोखंडे म्हणाले, बुद्ध धम्म बहुजन लोकांचा धम्म आहे. तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेबांनी संपूर्ण जगातील शोषीत समाजाला नवीन दिशा देण्याचे मोलाचे काम केले आहे. त्यामुळे आज आंबेडकरवादाला व्यवस्थीत समजून घेऊन मुल्याधिष्ठीत नवसमाजाची निर्मिती करण्याचा ध्यास मनी धरला पाहिजे. संदेश भालेकर म्हणाले, भारतीय संविधानाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असून माणसाला माणूस म्हणून जगण्याचे तत्वज्ञान त्यांनी दिले. याबाबत मुक्तीचा लढा लढताना जीवनातील सर्वच पातळ्यावर उठाव होणे आवश्यक आहे. समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, ही बाबासाहेबांची भूमिका होती. यावेळी भंते संघरत्न माणके व ना.राजकुमार बडोले यांचा बौद्ध बांधवांच्या व मेञ्ञा मैत्री संघ व आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले. संचालन डॉ.अशोक नंदेश्वर तर आभार विलास मेश्राम यांनी मानले. भिमोत्सव व सत्कार सोहळा कार्यक्रमासाठी एस.के. शेंडे, प्रशांत घरडे, पत्रकार विलास मेश्राम, राकेश लाडे, मनोज बडोले, कापीलाल आखरे, जयदेव खोब्रागडे, चंद्रहास चव्हाण, धनपाल ढवळे, मनोहर रंगारी यांच्यासह समाजबांधवांनी सहकार्य केले. या सोहळ्याला बारव्हा परिसरातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
संविधानाची जपणूक करा
By admin | Updated: February 8, 2016 00:41 IST