मोहाडी : बालकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छ भारत ध्येय गाठण्यासाठी बालक दिनापासून बाल स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.शाळा हे शिक्षणाचे केंद्र बिंदू आहे. या माध्यमातून पालक, समाज यांना बालकांकडून स्वच्छता, आरोग्य व नीटनेटकेपणा संदेश पोहचविणे सुलभ जाते. समाजापर्यंत स्वच्छतेचे संदेश बालक हे आदर्श व परिणाम कारक भूमिका बजावू शकतात. घरामध्ये भावंडे, त्यांचे सवंगडी यांच्यामध्ये स्वच्छतेविषयक जाणिव जागृती निर्माण होवू शकते. यासाठी शाळांमध्ये मीना राजूमंच, विद्यार्थ्यांचे विविध गट यामध्ये शाळा आरोग्य मंच यांच्यामार्फत आरोग्य व स्वच्छताविषयक विविध उपक्रमाची अंमलबजावणी करून बालकांना वैयक्तिक स्वच्छता, त्यांचे घर, सभोवतालचा परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवण्याचे महत्व पटवून बालकांना याकामी प्रोत्साहिम करणे आवश्यक आहे.प्रत्येक शाळांमध्ये मुलां-मुलींची स्वतंत्र स्वच्छतागृहे हात धुण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, नियमित स्वच्छता व आरोग्य विषयक निगा व देशभाल याबाबी असणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय यंत्रणेस निर्देश देण्यात आले आहेत.स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या मोहिमेअंतर्गत बालदिनाचे औचित्य साधून स्वच्छता व आरोग्य विषयक जाणीव जागृत करण्यासाठी बाल स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. २०१९ पर्यंत स्वच्छ भारताचे ध्येय गाठण्यासाठी बालकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. या मोहिमेअंतर्गत स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता व त्याद्वारे शाळेमध्ये आरोग्यदायी व प्रफुल्लीत वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. बालक व त्यांचे कुटूंब यांच्यामध्येही आरोग्यविषयक चांगलया सवयीसुद्धा रूजणार आहेत. आजाराचे प्रमाण कमी होऊन बालकांच्या उपस्थितीमध्ये वाढ होईल व त्यांची संपादणूक पातळी वाढण्यास मदत होईल. या मोहिमेअंतर्गत जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आदी स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबरला स्वच्छ शाळा व स्वच्छ परिसर, १५ नोव्हेंबर स्वच्छ व संतुलित आहार, १७ नोव्हेंबर स्वच्छमी वैयक्तिक स्वच्छता, १८ नोव्हेंबर स्वच्छ पाणी, १९ नोव्हेंबर स्वच्छ शौचालय हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. १४ नोव्हेंबरला सुटी असेल त्या शाळांनी या मोहिमेची सुरूवात १३ नोव्हेंबर रोजी करावा. या मोहिममे दरम्यान चित्रकला, निबंध, घोषवाक्ये, गायन, रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन शाळांनी करावे. या मोहिमेत शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वच्छता व आरोग्य विषयक संदेश, गोष्टी, प्रार्थना, गीते याबाबत मुलांशी संवाद साधावा, शाळेत हात धुण्याच्या जागी साबन, पाणी व हात रूमाल मुलांना उपलब्ध करून द्यावा. बालस्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक घरी स्वच्छता विषयक संदेश पोहचवून देण्यासाठी बालकांची स्वच्छता दूत म्हणून निवड करण्यात यावी. शिक्षणामधून विद्यार्थ्यामध्ये चांगल्या कलागुणांची जोपासणा करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमात लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभागी व्हावे व सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, पं.स. सदस्य, सभापती, जि.प. सदस्य, अध्यक्ष तसेच आमदार, खासदार मंत्री आदींनी बाल स्वच्छता मोहिम अंमलबजावणीमध्ये सहभागी करून घ्यावे, असे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)
बालक दिनापासून बालस्वच्छता मोहीम
By admin | Updated: November 8, 2014 22:33 IST