घोषणा लवकरच : नगरविकास मंत्रालयाच्या सचिवांशी काशीवार यांची चर्चा साकोली : सध्या सेंदूरवाफा व साकोलीवासीयांना नगरपरिषदेचे डोहाळे लागले असून नगरपरिषद केव्हा होणार, याचीच चर्चा चौकाचौकात ऐकायला मिळते. मात्र साकोली व सेंदूरवाफावासीयांना लवकरच नगरपरिषदेची गोड बातमी कळणार आहे. या नगरपरिषदेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली असून पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. या संदर्भात आ. बाळा काशीवार यांनी नुकतीच नगरविकास मंत्रालयाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी साकोली सेंदुरवाफ्याच्या विकासासंदर्भात चर्चा केली. तत्कालीन तहसीलदार डॉ.हंसा मोहने यांनी तात्काळ नगरपरिषदेचा अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता. या अहवालावर जिल्हाधिकारी कार्यालयाने हिरवी झेंडी दाखवित हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालय मुंबई येथे पाठविला.या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिव म्हैसकर व आ.बाळा काशिवार यांनी साकोली व सेंदुरवाफ्याला नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्यास संपूर्ण साकोली तालुक्याचा विकास साधता येईल व अनेक नवनवीन योजना आणता येईल असे पत्र पाठवून दिले. २०११ च्या जनगणनेनुसार साकोली सेंदुरवाफ्याची लोकसंख्या २५ हजार भरत असली तरी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांची संख्या व एकुण लोकसंख्या ही २५ हजाराच्या कितीतरी जास्त आहे. त्यामुळे येथे नगरपरिषद नक्कीच होऊ शकते. अनेक दिवसांपासून साकोलीवासीयांना नगरपरिषदेची प्रतिक्षा होती. नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागल्या होत्या. मुहूर्तची साकोलीवासीयांना प्रतिक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)
नगरपरिषदेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची मोहोर
By admin | Updated: August 30, 2015 00:25 IST