नागपुरात चर्चा : फडणवीस, गडकरी यांची मेंढेंनी घेतली भेट भंडारा : भंडारा नगर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची रविवारला नागपुरात भेट घेतली. या भेटीत भंडारा शहराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले. १८ डिसेंबरला जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली व पवनी नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पवनी वगळता तिन्ही नगर परिषदेत भाजपचे नगराध्यक्ष व सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. दरम्यान, रविवारला नागपूर भेटीवर असलेले मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेण्यासाठी सुनिल मेंढे, शुभांगी मेंढे गेले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. पाच मिनिटांच्या या भेटीत मेंढे यांनी भंडारा शहराच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ त्यांना दिली. यामध्ये जीर्ण झालेली पाईप लाईन बदलविणे, शहर अतिक्रमण मुक्त करणे, सांडपाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत नाल्या, गटारी बांधून शहर डासमुक्त करणे, शहरात बगिचांची निर्मिती करणे, जुन्या बगिचांचा विकास करणे, रस्त्यांचे रूंदीकरण करणे, नागरिकांना दाखल्यांसाठी होणारा त्रास बंद करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करणे, शहरातील प्रत्येक चौकांचे सौंदर्यीकरण करणे, चौकाचौकात वाहतूक सिग्नल्स लावणे, रस्त्यावर दुभाजक करून पथदिवे लावणे, हागणदारीमुक्त शहर करणे, गरिबांना घरकुल मिळवून देणे या उपाययोजनांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, भंडारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे या शहराचा ‘स्मार्ट सीटी’मध्ये समावेश होण्याची गरज आहे. तुम्ही योजना आणा आम्ही निधी देऊ, असे आश्वासन दिले. (जिल्हा प्रतिनिधी)
भंडाऱ्याला भरीव निधी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केले नगराध्यक्षांना आश्वस्त
By admin | Updated: December 27, 2016 01:14 IST