विर्शी केंद्रातील प्रकार : पोलीस तक्रारीला लोटले २७ दिवस साकोली : तालुक्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांचे ५० पोती धान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणाची तक्रार श्रीराम सहकारी भात गिरणी मर्यादित साकोलीचे अध्यक्ष पतिराम कापगते यांनी १ जानेवारी रोजी पोलीस ठाणे साकोली येथे दिली. २७ दिवसानंतरही पोलिसांना धान चोरटे आरोपी मिळाले नाही.श्रीराम सहकारी भात गिरणी साकोली संस्थेचे विर्शी येथे धानखरेदी केंद्र आहे. याही केंद्रावर धान खरेदी सुरू आहे. याच विर्शी संस्थेला आवारात अंदाजे एक हजार पोती धान शेतकऱ्यांनी विक्री करण्याकरीता आणून ठेवले होते दरम्यान ३१ डिसेंबर २०१५ चे रात्री मोतीराम लक्ष्मण कापगते या शेतकऱ्याचे ५० पोती धान वजन २० क्विंटल अंदाजे किंमत २८ हजार दोनशे रूपये किंमतीचा धान चोरीला गेला. या घटनेची तक्रार दुसऱ्याच दिवशीच साकोली पोलीस ठाणे येथे नोंदविण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यावर आर्थिक संकटमोतीराम कापगते या शेतकऱ्यांजवळ चार एकर शेतजमीन आहे. या शेतीच्या भरोशावर ते आपला व कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालवित असतात. यावर्षी निसर्गाची अवकृपा यामुळे आधीच धानाचे उत्पन्न झाले नाही. त्यातही चोरट्यांनी ५० पोती धान चोरून नेले.उर्वरित केवळ नऊ पोती शिल्लक राहिली. त्यामुळे अध्यक्ष मोतीराम कापगते व त्याच्या कार्यकर्त्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.शासनाने नुकसान भरपाई द्यावीशासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकरी विश्वास ठेवून धानविक्रीसाठी नेत असतात. त्याचप्रमाणे मोतीराम कापगते यांनीही विर्शी धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नेले. मात्र गर्दी असल्यामुळे धानाची मोजणी झाली नव्हती. म्हणून धानाची पोती इतर शेतकऱ्यांप्रमाणे संस्थेच्या आवारात होती. तिथे संस्थेचा चौकीदार रात्रपाळीला असतो. मात्र धानाची पोती चोरीला गेलीच कशी, हाही प्रश्न आहे. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्रावरून धानाच्या पोती चोरीला गेली, त्याची जबाबदारीही संस्थेने किंवा शासनाने झालेली नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी मोतीराम कापगते यांनी केली आहे.
'त्या' धान चोरट्याचा अद्यापही सुगावा नाही
By admin | Updated: January 28, 2016 00:36 IST