भंडारा : राज्य शासनाच्या निर्णयानुसार यावर्षी भंडारा जिल्ह्यातील एकूण १५ हजार ५२७ विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा रद्द झाली. परीक्षा रद्द झाल्याने आता मूल्यमापन कोणत्या पद्धतीने होणार? वैद्यकीय यासह पदवी व अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया घेण्याचे आव्हानच यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.
किंबहुना याबाबतचा संभ्रमही बारावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.
तीन ते चार विषयांची अथवा ऑनलाइन स्वरूपात परीक्षा होईल, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. याबाबत आता समोर काय होणार विचारमंथन सुरू आहे.
बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणतज्ज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन पर्यायांचा विचार करत होते. मे महिना संपला. परीक्षा होणार नाहीत ही स्थिती ही स्पष्ट झाली. विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव कमी करण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून झाली होती. यापूर्वी कोरोनामुळे सीबीएसई बारावीची परीक्षा ही रद्द करण्यात आली होती. आता पदवी व अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया घेण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.
बॉक्स
प्राचार्य म्हणतात,
बारावीची परीक्षा व्हायला हवी होती. पदवी, प्रथम वर्षासह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा विचार केल्यास इयत्ता बारावीतील विषयासंदर्भात परीक्षा होणे गरजेचे होते.
आता प्रवेश प्रक्रिया घेण्यासंदर्भात लवकरच धोरण जाहीर करावे, याची सर्वांना प्रतीक्षा आहे.
-केशर बोकडे, मुख्याध्यापिका, शास्त्री विद्यालय भंडारा.
बॉक्स
बारावीची परीक्षा रद्द झाल्याने आता अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मेरिटनुसार यादी तयार करण्यास अडचण होऊ शकते. वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येते. त्यामुळे तिथे फारसा अडचण निर्माण होणार नाही, असे वाटते.
- अशोक पारधी, कार्याध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना.
बॉक्स
पालक काय म्हणतात,
बारावीची परीक्षा रद्द केली. पण पूर्वपरीक्षा त्याऐवजी घेतली असती तर बरे झाले असते. बारावीचे वर्ष हे ‘टर्निंग पॉईंट’ म्हणून ओळखले जाते. यावर लवकरच निर्णय होणे अपेक्षित होते.
- मनोज लांजेवार, भंडारा.
परीक्षा रद्द झाल्याने वर्षभर अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. ऑनलाईन किंवा अन्य पर्यायांवर विचार करता आला असता. आता प्रवेश प्रक्रियाबाबत अडचण निर्माण होऊ शकते.
-मनोहर साखरे, भंडारा.
बॉक्स
विद्यार्थी म्हणतात,
बारावीचे पेपर व्हायला हवे होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता तरी मूल्यमापनाचे सूत्र लवकर जाहीर करून प्रक्रिया पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे.
- दुर्वेश कापगते, भंडारा.
वर्षभर अभ्यास केला, पण परीक्षा लांबणीवर व नंतर रद्द झाली. आता पुढील अभ्यासक्रमांच्याबाबत धोरण शासनाने लवकरच जाहीर करावे तरच आमची ही अडचण दूर होऊ शकते. याबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.
- शीतल आबेंडारे, भंडारा.
बॉक्स
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर मूल्यमापन आणि पदवी प्रथम वर्षासह अन्य अभ्यासक्रमांच्या पुढील प्रवेशाचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.