तुमसर : तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील गावात तथा जंगलव्याप्त परिसरात हातभट्या मद्यनिर्मितीचे प्रमुख केंद्र बनले आहे. भंडारा येथून पोलीस पथक येथून कारवाई करीत आहे. परंतु स्थानिक पोलीसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. येथे अर्थकारण दडल्याची चर्चा आहे.तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. येथील नदी काठावरील गावाशेजारी सर्रास मद्यनिर्मिती केली जाते. मोहफुल मध्य प्रदेशातून येथे आयात केला जातो. काही गावात शासनाची मान्यताप्राप्त मोहफुलाची विक्री केंद्र आहे. तुमसर- तिरोडी रेल्वेगाडीने मोहफुल मध्य प्रदेशातून आणले जाते. नदीकाठावर मोहफुलाची मद्य गाळप केली जाते. याकरिता बेरोजगार तरुणांची मोठी फौज येथे सक्रीय आहे. तुमसर तालुक्यात बऱ्याच गावात मोहफुल मद्य विक्रीची अनधिकृत दुकानेच आहेत. सहसा घरी किंवा गावाबाहेर मद्यविक्री केली जाते. या व्यवसायातून अनेकांनी मोठा पैसा कमाविला आहे. मद्यविक्रीची दुकाने कुठे आहेत ते गावात सर्वांना माहिती आहे. परंतु पोलीस विभागाला ती दिसत नाही. तुमसर तिरोडी रेल्वेगाडीने पहाटे मोहफुलाची दारुची खेप शहराजवळील रेल्वे स्थानकावर पोहचते अशी माहिती आहे.मध्य प्रदेश तथा महाराष्ट्राच्या सीमेतील जंगलात मोहफुल मोठ्या प्रमाणात मिळतो. सहज व स्वस्त उपलब्ध होणाऱ्या मोहफुलापासून मागील अनके वर्षांपासून मोहफुलाची दारु तयार करण्यात येत आहे. थातूरमातूर पोलीस कारवाई करतात. परंतु ठोस कारवाई अजूनपर्यंत झाली नाही. या व्यवसायात गुंतलेले लोक गुंडप्रवृत्तीचे असल्याने गावातील सामान्य नागरिक तथा महिला मंडळ सहसा तक्रारीकरिता पुढे येत नाही. अनेक महिला मंडळाच्या तक्रारींना स्थानिक पोलीस केराची टोपली दाखवितात.तुमसर, मोहाडी, सिहोरा, आंधळगाव व गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत हातभट्ट्यावर मद्यनिर्मिती केली जाते. मागील १० ते १२ दिवसांपासून भंडारा येथील विशेष पोलीस पथक मद्यनिर्मिती केंद्र व मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. परंतु स्थानिक पोलीस मात्र मूग गिळून गप्प आहे.हातभट्टीच्या दारुमुळे मालवण येथे सुमारे १४० जणांचा बळी गेला, त्यापासून येथे धडा घेण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
वैनगंगा खोरे बनले मद्यनिर्मितीचे केंद्र
By admin | Updated: July 13, 2015 00:47 IST