अनेकजण पडले बळी : खात्यातून रक्कम लंपासमोहाडी : तुमच्या एटीएम कार्ड सिस्टममध्ये बिघाड आल्यामुळे लॉक झाला आहे. त्याला पुन्हा सुरू करण्यासाठी मी जसा सांगतो तसे करावे, असा दूरध्वनी येथील अनेकांना आला असून त्यांना हजारोंचा चुना लावण्यात आला असल्याने अशा फोन कॉलवर विश्वास करू नये, बँकेशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीसातर्फे करण्यात आले आहे.आजकाल मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभने देवून लुटण्यचे प्रकार वाढलेले आहेत. हे लुटारू दुसऱ्या राज्यातील राहात असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचण्यास पोलिसांना कसरतच करावी लागते तरी त्यांचा थांग पत्ता अजूनतरी लागलेला नाही. येथील शिक्षक वसंत लिल्हारे यांना ८ जुलैला अशाच एक फोन या मोबाईल क्रमांकावरून आला. मी एटीएम डिपार्टमेंट मुंबई येथून मॅनेजर पवन बन्सल बोलतो आहे. तुमचा एटीएम कार्ड लॉक झाला आहे. तुम्ही एटीएम कार्ड हातात ठेवा व मी जसे म्हणतो तसे करा म्हणजे तुमचा एटीएम कार्ड सुरू होईल, असे सांगण्यात आले. मात्र वसंत लिल्हारे यांनी अगोदर बँक मॅनेजरला विचारतो असे म्हटल्यावर पलीकडून कॉल बंद करण्यात आली. मात्र या अगोदर या प्रकारचे कॉल अनेक लोकांना आले व त्यांचया खात्यातून रक्कम लंपास करण्यात आली. लिल्हारे यांनी जशी सावधगिरी बाळगली तशी अनेक लोक बाळगत नाही व फसतात. वसंत लिल्हारे यांनी त्वरीत बँकेशी संपर्क केला व आलेला कॉल् हा फ्राड होता, असे समजल्यावर त्यांनी लगेच मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जनतेने सुद्धा अशा खोट्या कॉलवर विश्वास करण्यापुर्वी कोणाकडून खात्री करणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)
सावधान, बनावटी कॉल केव्हाही येऊ शकतो!
By admin | Updated: July 12, 2014 23:29 IST