भंडारा : आरोग्य सेवा देण्यासाठी धडपडणारे रुग्णवाहिका वाहन चालक अनेक समस्यांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. परिणामी त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावणारा आहे. त्यांच्या समस्यांचे तातडीने निवारण करावे, अन्यथा कुटुंबासह बेमुदत उपोषणाचा इशारा एनआरएचएम अंतर्गत असलेल्या कंत्राटी वाहन चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.आपीएसएस प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका वाहन चालकांच्या नियुक्त्या रुग्णकल्याण समितीमार्फत दि.१ आॅगस्ट २०१४ पासून प्रतिमाह वेतन आठ हजार रूपये प्रमाणे करण्यात आले. परंतु दोन महिन्याचे वेतन वाहन चालकांना मिळालेले नाही. वाहन चालक २४ तास रुग्णांना आमच्या जिवाची व कुटुंबाचा विचार न करता रात्री अहोरात्री ग्रामीण भागात कोणत्याच प्रकारची भिती न बाळगता रुग्णांना घरून उपकेंद्र ते प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे सोईनुसार पोहचवितात. सर्व वाहन चालक सन २००९ पासून आजपर्यंत सुरळीतपणे कंत्राटी एनआरएचएम अंतर्गत तथा रुग्णकल्याण समितीमार्फत अशा प्रकारे पाच वर्षापासून रुग्णांना सेवा देत आहोत.त्यामध्ये जेएसके अंतर्गत एएनसी व पीएनसीकेसेस घरून आणने परत सोडणे, मानव विकास कार्यक्रम कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केसेस भरती करणे परत घरी सोडणे, जनरल पेसंट सोडणे, वैद्यकीय अधिकारी यांचे आदेशाने यांचेसोबत ग्रामपंचायत भेटी, उपकेंद्र भेटी, अंगणवाडी भेटी व शासनाचे वेळेवर येणारे उपक्रम यांचेमध्ये सेवा देतात.वेतन प्रतिमहा आठ हजार प्रमाणे रुग्णकल्याण समितीमार्फत त्वरीत दिवाळीपुर्वी देण्यात यावी. वाहन चालकांना तुटपुंज्या वेतनावर आई, वडील, पत्नी, मुले यांचे पालन पोषण, औषधोपचार, शिक्षण आपल्याकडून मिळत असलेल्या रूपये आठ हजार वेतनावर करावा लागतो. त्यांच्या व्यथा समजून समस्याकडे लक्ष केंद्रित करून कुटूंब जगविण्यासाठी व जगण्यासाठी वेतन शीघ्रगतीने देण्यात यावे. वाहन चालकांच्या जीवनाची एक प्रकारची शासन प्रशासन थट्टाच करीत आहे. केंद्रातील एनपीसीसी समितीच्या निर्णयानुसार व आपल्या आदेशानुसार रुग्णकल्याण समितीमार्फत वाहन चालकाची निवड करून दिनांक १ आॅगस्ट २०१४ पासून पगार वाढीच्या खुशीखुशीने सर्व वाहनचालक रुग्णांना सेवा देत आहेत. शासनाच्या एनपीसीसी समितीने ठरवून दिलेल्या रूपये आठ हजार वेतन आम्हाला त्वरित देण्यात यावा, दोन महिने दहा दिवस रुग्णकल्याण समितीमार्फत काम केलेले आहे. मागील प्रमाणे रूपये सहा हजार वेतनावर काम करणे हा अन्याय का, आम्ही रुग्णकल्याण समितीने ठरवून दिलेले वेतन आठ हजार रूपये प्रतिमाह प्रमाणेच घेणार अन्यथा कमी वेतन घेणार नाही, असा निर्णय वाहनचालकांनी घेतला आहे. चालकांच्या व्यथा लक्षात घेता समस्याचा निराकरण करून अतिदक्षतेने न्याय मिळवून द्यावा अन्यथा २० आॅक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ आॅक्टोबर ला जिल्हा परिषद भंडारा येथे सर्व वाहनचालक कुटुंबासहित आमरण उपोषण करण्याचा इशारा वाहन चालकांच्या संघटनेनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
रुग्णवाहिका वाहनचालक समस्यांच्या विळख्यात
By admin | Updated: October 20, 2014 23:08 IST