भंडारा : शनिवारला नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख असतानाही एकाही राजकीय पक्षाने आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. परिणामी, उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ज्यांनी सहा महिन्यांपासून तयारी केली आहे आणि ज्यांना उमेदवारीचे आश्वासन मिळाले आहेत, अशांना उमेदवारी मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५२ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीच्या १०४ जागा आहेत. ११ जून रोजी घोषित झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख शनिवारची (२० जून) आहे. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षाने अद्याप एकाही उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने बहुतांश ठिकाणी उमेदवारांना कामाला लागण्याचे आश्वासन दिले असले तरी काँग्रेसच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेसने जिल्हास्तरावर तयार केलेली यादी मुंबईत पक्षश्रेष्ठीसमोर ठेवण्यात आली. त्यावेळी त्या-त्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या समर्थकांची नावे सादर केल्यामुळे बहुतांश जिल्हा परिषद गटात दोन उमेदवारांचे पॅनेल तयार करण्यात आले. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमेदवारीचा तिढा कायम आहे.भाजपमधून उमेदवारीचे आश्वासन मिळाल्यामुळे मागील काही दिवसांपासून इच्छुकांनी घरोघरी भेटी देणे सुरू केले होते. ऐनवेळेवर उमेदवारी न मिळाल्यामुळे काहींनी शिवसेनेत प्रवेश करुन बंडाचा झेंडा रोवला आहे. काँग्रेसची उमेदवारी न मिळणाऱ्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार झाली असून उमेदवारांची घोषणा तेवढी शिल्लक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
उमेदवारांची नावे अद्याप गुलदस्त्यात!
By admin | Updated: June 20, 2015 01:06 IST