साकोली : साकोली तालुक्यात नुकतीच पार पडलेली कोतवाल भरती प्रक्रीयेत मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला असून अधिकाऱ्यांनी मनमर्जीने व भ्रष्टाचार करून भरती प्रक्रिया करण्यात आली. यात पात्र उमेदवारावर अन्याय करण्यात आला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी व ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी आंबेडकर सेक्टर फाूर जस्टीस अॅन्ड पीस संघटनेचे अध्यक्ष विलास मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.या निवेदनाप्रमाणे, साकोली तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रिया २०१४ ही पारदर्शकरित्या न करता भ्रष्टाचारी पद्धतीने करण्यात आली. तहसीलदार साकोली यांनी आपल्या मनमर्जीने उमेदवारांची पात्रता लक्षात न घेता भरती प्रक्रिया राबविली. यामुळे भ्रष्टाचारी पद्धतीने प्रक्रिया राबविल्याचे परिसरात बोलले जात आहे. यामध्ये क्रमांक १ व २ नंबरचे गुण घेवून परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना घरचा मार्ग दाखविण्यात आला आहे व वाममार्गाने जाणाऱ्यांना पात्र ठरवून अंतिम यादी दि. १ जुलैला तोंडी परीक्षेचे दिवशी न लावता दि.२ जुलैला सायंकाळी ७.१५ ला तहसील कार्यालयाच्या दरवाज्याला लावण्यात आली. त्यामुळे ही भरती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. यामुळे हुशार उमेदवारावर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे ही भरती प्रक्रियाच रद्द करण्यात येवून दि.१ ला घेण्यात आलेली तोंडी परीक्षा रद्द करावी व तोंडी परीक्षा घ्यायचीच झाल्यास छायाचित्रीकरणात घेण्यात यावी. या भरती प्रक्रियेची चौकशी करून ताबडतोब दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी व अन्यायग्रस्त उमेदवारांना न्या देण्यात यावा व ही भरती प्रक्रिया रद्द न झाल्यास संपूर्ण अन्यायग्रस्त उमेदवार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
कोतवाल भरती रद्द करा : अन्यथा उपोषण
By admin | Updated: July 3, 2014 23:25 IST