नव्याने ऑनलाईन प्रथम वर्ष प्रवेश पद्धत विद्यापीठात लागू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन २० रुपये भरणे, कागदपत्रे ऑनलाईन करणे, प्रिंट काढणे व सर्व कागदपत्रे संबंधित महाविद्यालयात जमा करण्याच्या सूचना पालक व विद्यार्थ्यांना करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तसेच आर्थिक नुकसान होणार आहे.
अनेक विद्यार्थ्यांजवळ मोबाईल नाहीत, असल्यास नेटवर्क नाही, विद्यार्थ्यांजवळ प्रिंट मशीन, संगणक, बँकेत खाते नसल्याने विद्यार्थी खाजगी संगणक केंद्रात जातील. यामुळे विद्यार्थ्यांना अधिकचा खर्च येईल. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. त्यांना २५ ते ४० किलोमीटर अंतराचा प्रवास करून विद्यापीठ पदवी प्रथम वर्ष प्रवेश अर्ज भरण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागणार आहे. प्रिंट्स संबंधित महाविद्यालयात जमा कराव्या लागणार आहेत.
कोरोना संकटकाळाने विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने पदवी प्रथम वर्षाचा प्रवेश संबंधीत निर्णय रद्द करावा. प्रवेश सुविधा सहज व सुलभ करण्याची तजवीज करावी, अशी मागणी उदापुरे यांनी केली आहे.