बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ : वंदना वंजारी यांचे प्रतिपादन भंडारा : या अभियानाचा मुख्य उद्देश बालकांचे आरोग्य सुधारणे व गरजू बालकांना त्वरीत सेवा उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे. नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेवून बालकांचे आरोग्य सुदृढ करावे. तसेच बालकांना निरोगी आरोग्य देवून बालमृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी अभियानाची जास्तीत जास्त जनजागृती करावी व सुदृढ बालक, सशक्त युवक निर्माण करून संपन्न महाराष्ट्र निर्माण करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी यांनी केले.जागतिक आरोग्य दिनानिमित्त बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ आरोग्य विभागातर्फे सामान्य रुग्णालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्य व वित्त सभापती संजय गाढवे यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिवेदी, आहार तज्ञ वनिता चकोले प्रामुख्याने उपस्थित होते.आपल्या उद्घाटनपर भाषणात आरोग्य सभापती गाढवे यांनी सुरक्षित आरोग्यासाठी पौष्टीक अन्नाचा वापर करावा. त्यासाठी सेंद्रीय खताचा वापर करा. भाजीपाल्यावर किटकनाशक फवारणी टाळावी जेणे करून विषबाधीत फळे, अन्न खाण्यास टाळता येईल, असे सांगितले.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातुरकर यांनी सुरक्षित अन्नाविषयी माहिती देवून संपूर्ण जिल्ह्यात बाल आरोग्य अभियान राबविण्याविषयी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य पर्यवेक्षक भगवान मस्के यांनी केले तर आभार जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. श्रीकांत आंबेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, नर्सिंग स्कुलचे प्रशिक्षणार्थी तसेच रुग्णालयातील अधिपरिचारीका व स्टाफ नर्स उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी अभियान
By admin | Updated: April 8, 2015 00:49 IST