तुमसर : या खरीप हंगामात धान पिकाचा उतारा कमी येण्याचे भाकीत वर्तविण्यात आले असले तरी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती मागील १८ दिवसात विक्रमी २८ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. राज्यात धानाची ही मुख्य बाजारपेठ मानली जाते तर देशात तांदूळनगरी म्हणून तुमसरची ओळख आहे.राज्य शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. हलके धान निघून २० ते २२ दिवस झाले आहेत. शेतकऱ्यांकडून कमी भावात धान खरेदी करणे व्यापाऱ्यांनी सुरू केले आहे. त्या अनुषंगाने तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीने दि.१८ आॅक्टोबरपासून धान खरेदी करणे सुरू केले. दि.१८ आॅक्टोबर ते दि.५ नोव्हेंबरपर्यंत बाजार समितीच्या मार्केट यार्डावर २८ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. दररोज येथे मोठ्या प्रमाणात धान विक्रीस येत आहे.सध्या तुमसर, मोहाडी व पवनी तालुक्यातून धान विक्रीस आले आहे. येथे हलक्या धानाला १३०० ते १३५०, वायएसआर २१५०, बारीक धानास २१०० ते २०५०, डी १०० धानास १७०० ते १७५०, रूची धानाला १८०० ते १८५०, पारस १६५० ते १७०० किंमत येत आहे. अडत्या येथे सकाळी १० ते १२.३० पर्यंत बोली करतात. त्यानंतर धानाचे वजन केले जाते. येथे शेतकऱ्यांना अडत्यांच्या माध्यमातून व्यापारी रोख धानाची किंमत देत असल्याने शेतकऱ्यांचा लोंढा येथे जास्त येत आहे. बाजार समितीला १ ते सव्वा टक्के शेष म्हणून प्राप्त होते. खुली लिलाव पद्धती असल्याने कृषी मालाची किंमत शेतकऱ्यांच्या समोर केली जाते. तुमसर व मोहाडी येथे बाजार समितीचे मार्केट यार्ड आहे. लहान शेतकऱ्यांना येथे धान घेवून येणे परवडत नाही. ये-जा करण्याचा खर्च करावा लागतो. धानाची बोली लावल्यावर लवकर वजन होत नाही, अशी काही शेतकऱ्यांची ओरड आहे. काटा करणारे कर्मचारी बाजार समितीने वाढविण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांच्या तावडीतून काही शेतकरी निश्चित सुटले असले तरी आधारभूत धान केंद्र मोठ्या गावात सुरू करणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)
केंद्र सुरू होण्यापूर्वीच धान खरेदी
By admin | Updated: November 6, 2014 22:49 IST