लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भरधाव एस. टी. बस खड्ड्यातून उसळल्याने बसमधून प्रवास करणारी महिला सीटवरून खाली कोसळली आणि तिचा मणका फ्रॅक्चर झाला. ही घटना लाखांदूर - पालांदूर मार्गावरील भावडजवळ घडली. अर्चना धाळू मेश्राम (३०, रा. पालांदूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. ती बेलाटी थांब्यावरून अड्याळ येथे जाण्यासाठी एस. टी. बसमध्ये बसली होती. भावड येथे जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. मात्र, चालकाने वेग कमी न करता बस वेगाने चालवित होता. याबाबत प्रवाशांनी त्याला सूचनाही दिली. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता. अशातच भावड गावाजवळ एका खड्ड्यातून बस उसळली आणि अर्चना सीटवरून खाली कोसळली. त्यात तिचा मणका फ्रॅक्चर झाला. ही घटना २४ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी रविवारी अड्याळ ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून बसचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.