भंडारा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष ताकदीनिशी रिंगणात आहे. उमेदवारी देताना कुठलाही दुजाभाव न करता सर्वच समाजातील घटकांना उमेदवारी दिली. केंद्रात पुंजीपतींच्या बळावर सत्तेवर आलेल्या सरकारने त्यांच्याच हिताची धोरणे राबविणे सुरू केले आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने भ्रष्टाचाराशिवाय दुसरे काही केले नाही. अशा वाटोळे करणाऱ्या आघाडी सरकारला दूर सारुन भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडवा, असे आवाहन बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केले.भंडारा विधानसभा क्षेत्राच्या बसपाचे उमेदवार देवांगणा विजय गाढवे यांच्या प्रचारार्थ दसरा मैदानावर आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. मंचावर बसपाचे प्रदेश प्रभारी अॅड. विरसिंग, अॅड. सुरेश माने, जिल्हाध्यक्ष संजय गाढवे व उमेदवार उपस्थित होते. यावेळी त्या म्हणाल्या, विदर्भातील नागरिक अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत असताना सत्ताधाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. तुम्ही बसपाला पूर्ण बहुमताने सत्ता द्या, आम्ही स्वतंत्र विदर्भ देऊ, अशी ग्वाही दिली. बसपा कार्यकर्त्यांच्या बळावर उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्षाने चारवेळा सत्ता मिळविली. या कार्यकाळात अनेक भरीव विकास कामे करण्यात आली. निराधारांना पक्की घरे बांधून देण्यात आली. भूमिहिनांना जमिनीचे पट्टे देण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यात आली. विविध योजनांद्वारे गरीबांना न्याय देण्यात आला. बेरोजगारांना रोजगार भत्ता देण्याऐवजी कायमस्वरुपी नोकरी दिली. सर्वजन सुखाय, सर्वजन हिताय, या धर्तीवर उत्तरप्रदेशला उत्तम सरकार दिले आहे. सोशल इंजिनियरींगचा प्रभावी उपयोग करीत राज्याला विकासाकडे नेले. त्याच धर्तीवर महाराष्ट्राची प्रगती साधण्यासाठी बसपाला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी बसपा हाच पर्याय
By admin | Updated: October 11, 2014 01:15 IST