देवानंद नंदेश्वर भंडाराभंडारा शहरासह जिल्ह्यात असलेल्या महापुरूषांच्या पुतळ्यांच्या बाबतीत स्थिती विदारक आहे. नगरपरिषदेसह स्थानिक प्रशासनाला नव्हे तर संपूर्ण जिल्हावासीयांसाठी ही लाजीरवाणी बाब असली तरी त्याचे कोणालाच काही सोयरसुतक नसल्याचे भंडारा जिल्ह्यातील पुतळ्यांच्या स्थितीवरून स्पष्ट होत आहे. सरंक्षणाअभावी अनेकदा पुतळ्याची विटंबना झालेली आहे. त्यानंतर जातीय तेढ निर्माण होत असतो. अतिक्रमण, छोटे व्यावसायिक, वाहनांचा विळखा वाढत असल्याने पुतळ्यांचा श्वास गुदमरतोय की काय? अशी स्थिती झाली आहे.महापुरूषांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेण्यासाठी पुतळे चौका-चौकात उभारले जातात. मात्र त्या पुतळ्यांच्या संरक्षणासाठी शहरात नगरपरिषद किंवा गावात ग्राम पंचायत धजावतही नाही. भंडारा शहरात महापुरूषांच्या पुतळ्यांची संख्या खूप जास्त नाही. मात्र या मोजक्या पुतळ्यांचीही देखभाल नगर परिषदेला करणे शक्य होत नाही. पुतळ्यांचे महात्म्य योग्यरितीने जपले जात नसल्यामुळे बेवास कुत्री पुतळ्याभोवती तिथे जाऊन अभिषेक करतात. चिमण्या, कावळे पुतळ्यांना मुलामा चढविण्याचे काम करताना दिसतात. शहराच्या गांधी चौकात असलेल्या पुतळ्याचे हाल तर आणखीच बेकार आहेत. येथे वाहनांची नेहमी वर्दळ असते. व्यापारीवर्ग कचरा रस्त्यावर फेकतात. त्रिमूर्ती चौकात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला सरंक्षण भींत आहे. भींतीला लागूनच व्यापारी वर्गाकडून कचरा टाकला जातो. नंतर त्याच ठिकाणी तो पेटविला जातो. फुटपाथवर बसणारे ठेलेवाले सायंकाळी याच पुतळ्याजवळ कचरा टाकून निघून जातात. पुतळ्याभोवतीची जागा तर जणू चारचाकी वाहनांसाठी हक्काचे पार्किंग स्थळ झाले आहे. कोणीही यावे आणि गाडी लावून जावे अशी तेथील स्थिती आहे. येथे असलेली दुरवस्था हटविण्याचे सौजन्य पालिका प्रशासनाकडून केल्याचे ऐकिवात नाही. शुक्रवारी वॉर्डातील छत्रपती शिवाजी महाराज तथा सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची स्थिती काहीशी अशीच आहे. या पुतळ्याच्या शेजारी असलेला कचरा नगरपरिषदेने मागील अनेक दिवसांपासून उचललेला नाही. केवळ जयंती किंवा पुण्यतिथी कार्यक्रमाच्यावेळी साफसफाई केली जाते, असे नागरीकांचे म्हणणे आहे.पोस्ट आॅफिस चौक ते गांधी चौक दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा आहे. या पुतळ्याचा चबुतरा तर सर्वांसाठी कोणतेही शुभेच्छा फलक लावण्याचे हक्काचे ठिकाण झाले आहे. वर्षातील काही दिवसच हा पुतळा मोकळा श्वास घेतो.या पुतळ्याभोवतीही आता छोट्या व्यावसायिकांकडून ठाण मांडले जात आहे. विशेष म्हणजे स्वच्छतेचा जागर करणाऱ्या या महापुरूषाच्या पुतळ्याभोवती मात्र अनेक वेळा कचऱ्याचा ढिग साचलेला असतो तर कधी मोकाट जनावरांचे ठाण असते. त्यामुळे हा पुतळा आपल्याच दुर्दशेवर अश्रू ढाळण्यापलिकडे काहीही करू शकत नाही.महाराष्ट्र शासनाने सन २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. त्या मोहीमेंतर्गत गठित करण्यात आलेल्या समित्यांनी आपल्या गावातील पुतळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तीन वर्षापूर्वी स्वीकारली होती. त्यामुळे ग्राम पंचायतने पुतळ्यांचे जतन केले किंवा नाही. तरी त्या पुतळ्यांकडे दुर्लक्ष होत नव्हते. परंतु शहराच्या ठिकाणच्या पुतळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी नगर परिषदेवर आहे. तरीही नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करते.देखभालीचा प्रश्न अनुत्तरित४राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींच्या पुतळा उभारणीला परवानगी देण्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे घालून देत प्रस्ताव पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे.त्यामुळे परस्पर पुतळ्याची उभारणी होऊन पुन्हा वाद होण्यास काहिसा प्रतिबंध बसला आहे.पण सध्या उभारण्यात आलेल्या पुतळ्यांच्या देखभालीचा प्रश्न अजुनही अनुत्तरित राहतो. सण, उत्सव, जयंतीशिवाय राष्ट्रपुरुषांची आठवण येत नसल्याची प्रचिती परिसरात फेरफटका मारल्यानंतर लक्षात येते.जिल्ह्यात १,०४० पुतळेमहापुरूषांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी जिल्ह्यात १०४० पुतळे उभारण्यात आले. यात महात्मा गांधी यांचे ७५ पुतळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ४१८, गौतम बुध्द ३२६, छत्रपती शिवाजी महाराज १७, पंडीत जवाहरलाल नेहरू १०, इंदिरा गांधी २०, महात्मा ज्योतिबा फुले ४१, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४०, सावित्रीबाई फुले ११, राणी दुर्गावती १, संत रविदास २५, संत ज्ञानेश्वर ३, बिरसामुंडा ३, संत रविदास ५, संत गाडगे महाराज २०, रमाबाई आंबेडकर २, स्वामी विवेकानंद २, सुभाषचंद्र बोस ६, झाशीची राणी ४, अहिल्याबाई होळकर २ व इतर महापुरूषांचे पुतळे आहेत. सौंदर्यीकरण होईल का?शहरातील पुतळ्यांचे संरक्षण करण्याचे काम नगर परिषदेचे असताना कोणतीच उपाययोजना केली जात नाही. या पुतळ्यांना त्रास देणाऱ्या बेवारस जनावरांचा बंदोबस्तही न.प.करीत नाही. वर्षभर भंडारा शहरातील पुतळ्यांवरील धूळ स्वच्छ होत नाही. पावसाच्या पाण्याने पुतळे धुवून निघतात. पुतळ्याच्या आजू-बाजूला सौंदर्यीकरण केल्यास त्यांचा सन्मान होऊ शकतो. परंतु त्याबाबत नगर परिषदेकडे कोणतेही नियोजन नाही. वर्षभर त्या ठिकाणी झाडू लावले जात नाही. ज्या महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी असली त्याचवेळी नगरपरिषदेकडून स्वच्छता केली जाते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
गुदमरतोय पुतळ्यांचा श्वास
By admin | Updated: February 13, 2015 01:01 IST