ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : घर लहान होते, तेव्हा घरात माणसं मावत नव्हती. अन् आता टोलेजंग बंगला आहे, पण राहायला कुणी नाही. पाखरे दूरदेशी अन् टुमदार बंगल्यात गुदमरतोय वृद्धांचा श्वास, अशी अवस्था शहरातील बहुतांश पॉश कॉलनींची झाली आहे. नातवांच्या किलबिलाटाची आस धरत आयुष्याच्या सायंकाळी एकटेपण त्यांना सतावत आहे.उमेदीचा काळ होता. दोन खोल्यांचं घर होतं. मुलेही लहान होती. परिस्थिती बदलत गेली. दोन खोल्यांच्या घराचे टोलेजंग बंगल्यात रूपांतर झाले. पण मुलगा पुण्यात, सून मुंबईत अन् आम्ही म्हातारे या घरात. सांगा कुणासाठी केला हा आटापिटा. घरात मन रमत नाही, अन् बाहेर जाता येत नाही, असे शब्द शहरातील कोणत्याही वसाहतीत गेलात तर वृद्धांच्या तोंडून ऐकायला येतात. भंडारा शहराचा विस्तार वाढत गेला. अनेक वसाहती निर्माण झाल्या. आयुष्याची पुंजी लावून टुमदार बंगलेही बांधले. पण आता त्या घरात रहायला कुणीच नाही.मुलांनी उच्च शिक्षण घेतले, कुणी अभियंता, कुणी डॉक्टर तर कुणी मोठ्या पदावर पोहचले. भंडारात त्यांच्या शिक्षणाशी मेळ खाणारी नोकरीच नाही. परिणामी टुमदार बंगल्यातील तरूणाई महानगरात विसावली. मुलगीही तिच्या सासरी सुखात आहे. अशा चौकोनी कुटुंबाची फाटाफूट झाली.आता या वसाहतीतील घरात राहतात ते आजी-आजोबा. वृद्धापकाळात एकाएका अवयवयांनी साथ सोडली, कुणाला गुडघ्यांचा आजार, तर कुणाला धड दिसत नाहीत. जे काही कराव लागतं ते या दोन वृद्धांनाच. विस्तीर्ण बंगल्याची देखभाल करणेही आता जमत नाही. घराचे स्वप्न बाळगून कर्ज घेऊन घर बांधले. पण आता साधी झाडपूस करतानाही दम लागतो. आरोग्याचा प्रश्न तर कायमचा सतावतो. शहरात असलेल्या कुण्या नातेवाईकाच्या मदतीने दवाखाना करावा लागतो. अनेकांना स्वयंपाक करणे शक्य होत नसल्याने खानावळीचे डब्बे लावावे लागतात.अशा एक ना अनेक समस्या या वृद्धांना सतावत आहे. मात्र मुलांचा फोन आला की आम्ही मजेत आहोत, असे सांगत फोन बंद झाला की डोळ्यांची आसवे टिपतात.
पाखरे दूरदेशी, टुमदार बंगल्यात गुदमरतोय वृद्धांचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:19 IST