नगरपरिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी मिनल करनवाल (आएएस) यांनी स्थापन केलेले पथक दिवसभर शहरातील विविध मार्गांवर फिरताना दिसत हाेते. या पथकात राहुल देशमुख, मिथुन मेश्राम, संग्राम कटकवार, मुकेश शेंद्रे, विकास सांडेकर, प्रणय साेनेकर, राहुल कटकवार, कदमकुमार संदेश यांचा समावेश हाेता. सकाळी ८ वाजता शहरातील मिस्कीन टॅंक परिसराला या पथकाने भेट दिली. तेव्हा तेथे काही चहाटपरी सुरू हाेत्या तसेच आठनंतरही लगतच्या बगिच्यात काही मंडळी माॅर्निंग वाॅक करीत असल्याचे दिसत हाेते. या सर्वांना या पथकाने बाहेर काढले. दिवसभर केवळ फळाची आणि भाजीपाल्याची दुकाने तेवढी सुरू हाेती. मंगळवार असल्याने किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आली हाेती. मात्र रस्त्यावर नागरिकांची बऱ्यापैकी गर्दी दिसून येत हाेती.
बाॅक्स
दुकान बंद ठेवले तर खायचे काय?
मिस्कीन टॅंक परिसरात नास्त्यासह चहाची दुकाने आहेत. हातावर आणून पानावर खाणारी मंडळी येथे व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी त्यांनी आपली दुकाने उघडली. मात्र त्याचवेळी नगरपरिषदेचे पथक तेथे पाेहाेचले. दुकान बंद करण्याचे निर्देश दिले. त्यावेळी याठिकाणच्या व्यावसायिकांनी दुकान बंद ठेवले, तर आम्ही खायचे काय, असा सवाल केला. त्यावेळी पथकाने तुम्ही पार्सल सुविधा देऊ शकता, असे सांगितले. मात्र अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवणेच पसंत केले.