लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बाजारातून फिरून येतो, असे सांगून घरून निघालेल्या तरूणाचा १२ दिवसानंतर मृतदेहच वैनगंगा नदीच्या मुंढरी घाटावर कुजलेल्या स्थितीत शनिवारी ९ वाजताच्या सुमारास आढळला. आशिष मोरेश्वर मलेवार वय(३०) रा.दत्तात्रय नगर तुमसर असे मृत तरूणाचे नाव आहे.३० जुलै २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बाजारातून येतो असे सांगून आशिष घरातून निघून गेला. रात्री उशिरापर्यंत आशिष घरी परत न आल्याने घरच्यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र त्याचा काहीच सुगावा लागला नाही.त्यामुळे दुसऱ्या दिवशी घरच्यांनी तुमसर पोलीस ठाणे गाठून सकाळच्या सुमारास आशिष बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. त्याच्या दूरध्वनी क्रमांकावरून त्याचे लोकेशन सीडीआर आधी काढण्याची विनंती केली. परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. पोलीस ठाण्याच्या चकरा मारून काही साध्य झाले नाही. दरम्यान १२ दिवसानंतर मोहाडी तालुक्यातील मुंढरी घाटावर नदीकाठावर तेथील नागरिकांना कुजलेल्या स्थितीत मृतदेह दिसल्याने मोहाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सु.बो. उपजिल्हा रुग्णालयात आणत असताना घटनेची माहिती मिळाल्याने आशिषच्या नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मृतदेह कुजलेला असल्याने त्याला ओळखणे कठीणच होते. मात्र त्याने वापरलेल्या कपड्यावरून व कमर पट्यावरून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. आशिषने आत्महत्या केली की त्याची कुणी हत्या केली ही बाब अजूनही गुलदस्त्यात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:53 IST