राज्य शासनाने गौरविले : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदानभंडारा : राज्य शासनाने नगरपालिकांसाठी हागणदारीमुक्त योजना राबविली होती. यात भंडारा शहराने नामांकन मिळविले. शहर हागणदारीमुक्त झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत एका कार्यक्रमात भंडारा पालिकेच्या कार्याची दखल घेवून पालिकेच्या अधिकाऱ्यांना गौरविले. हागणदारीमुक्त गाव योजनेप्रमाणेच नगरपालिका असलेल्या शहरांनाही हागणदारीमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने मागील वर्षी हागणदारीमुक्त शहर ही योजना राबविली. या योजनेत राज्यातील प्रत्येक नगरपालिकांनी सहभाग घेतला. त्यादृष्टिने भंडारा नगरपालिकेने शहर सुंदर व स्वच्छ करण्याचा ध्यास घेतला. त्यादृष्टिने नगराध्यक्ष बाबू बागडे व तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांच्या मार्गदर्शनात पालिकेचे सर्व नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेवून शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी ठेवलेले उद्दिष्ट्य पालिका प्रशासनाने गाठल्याने याची दखल राज्य शासनाने घेतली.राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारीमुक्त झालेल्या सर्व पालिकांचा गौरव समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १३ आॅक्टोबरला मुंबईत पार पडला. भंडाराचे तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र देवतळे व विद्यमान मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी हा पुरस्कार स्विकारला. कार्यक्रमाला प्रधान सचिव मनिषा मैसकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्व नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र देवतळे, मुख्याधिकारी अनिल अढागळे व पालिकेचे सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्यामुळे हे यश मिळाल्याचे नगराध्यक्ष बाबू बागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)
भंडारा शहर झाले ‘हागणदारीमुक्त’
By admin | Updated: October 15, 2016 00:33 IST