कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन : मागील वर्षापेक्षा जास्त पाऊस बोंडगावदेवी : गेल्या काही दिवसांपासून पावसाने सतत थैमान घातल्याने रोवणीच्या कामाला वेग आलेला दिसत आहे. बांध्यांमध्ये भरपूर पाणी आहे. परंतु भाताचे पऱ्हे (नर्सरी) रोवणी योग्य नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केलेली दिसत नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार जवळपास आठशे हेक्टरमध्ये रोवणी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. बऱ्याच लांबणीनंतर परिसरात सतत तीन-चार दिवस पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे शेतकरीबांधवांनी मोठ्या लगबगीने रोवणीच्या कामाला सुरुवात केली. यावर्षीचा शेती हंगाम मागेपुढे सुरू झाल्याने सध्यातरी मजुरांची कमतरता जाणवत नाही. पाहिजे तशी रोवण्याच्या कामाची मजुरी अपेक्षेपेक्षा वाढलेली दिसत नाही. भाताच्या पऱ्हे टाकणीला काही शेतकऱ्यांना विलंब झाल्याने, एकाच वेळी रोवणीच्या कामाला सुरुवात झालेली दिसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २२ हजार ५८४ हेक्टरमध्ये भाताची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २१ हजार ३८४ हेक्टर क्षेत्रामध्ये रोवणी तर १ हजार २०० हेक्टर मध्ये आवत्या पद्धतीने भाताची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील ८०० हेक्टर क्षेत्रामध्ये रोवणी झाली. १३ जुलैपर्यंत तालुक्यात एकूण ४०१.२ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३५२.६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी चांगला दमदार पाऊस पडल्याने आजतरी बळीराजा सुखावलेला दिसत आहे. पावसाने उसंत दिल्याने सामान्य माणूस इतर महत्वाच्या कामाला वळलेला दिसतो आहे. याचप्रमाणे पावसाचा वेग पाहीला तर हलक्या धानाची रोवणी होण्याला वेळ लागणार नाही. यामुळे उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही अशी शक्यता कृषी विभाग वर्तवीत आहे. (वार्ताहर) कृषी विभागाकडून जनजागृती कृषी जागृती सप्ताहानिमित्त गावागावात शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. धान रोवणी आदि पऱ्ह्यांमध्ये ५०० मिली क्लोरोफायरी फास्ट २० टक्केची ड्रेनचिंग करावे. जेणेकरुन गादमाशी व खोडकिडा याचे नियंत्रण करता येईल. भात रोवणी करताना मिश्रखताचा व संयुक्त खताचा डोज चिखलावरच द्यावा. उगवठा पूर्ण तननाशकाचा वापर रोवणीनंतर ५ दिवसांच्या आत करावा, अन्यथा करु नये. असा मार्मिक सल्ला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात येत आहे.
दमदार पावसाने रोवणीला वेग
By admin | Updated: July 18, 2016 01:32 IST