भंडारा : शहरातील चौकांची दुरवस्था झाली असून त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, तसेच अन्य समस्या सोडविण्यात यावा या मागणीला घेऊन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा भंडारातर्फे पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भंडारा शहर व जिल्हा तलावांसाठी ओळखला जातो भंडारा शहरातील तलाव आता गिळंकृत होत आहे. परंतु तलावांच्या सौंदयीकरणासाठी उपेक्षितपणाचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक झाले आहे. तसेच भंडारा शहरातील महत्त्वाचे चौक असलेल्या परिसराचीही दुरवस्था झाली आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे समस्या ‘जैसे थे’ असे आहे. यातीलच एक चौक म्हणजे नागपूर नाकावरील आहे. यात या बिरसा मुंडा चौक सभोवताल असलेले लोखंडी कुंपण बाहेर निघून आले आहेत. त्यामुळे जीवहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. महापुरुषांच्या नावे असलेल्या चौकाची अशी दुरवस्था चांगली बाब नाही. त्यामुळे दोन ते तीन दिवसात या चौकाची स्वच्छता करून सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे. निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष शिशुपाल भुरे, जिल्हाध्यक्ष यशवंत भोयर, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी, संपर्कप्रमुख सुवित बोदेले, महासचिव शुभम सिडाम, गिरीश कुंभरे, अनिल टेकाम, शशिकांत देशपांडे, दिगंबर गाढवे, पन्ना सार्वे, आकाश मडावी, आशु वलके, निशांत सलामे, विष्णू मळकाम, गुणवंत भुरे, गणेश नंदनवार, अंकुश वंजारी, मुकुंदा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
बॉक्स
अशा आहेत अन्य मागण्या
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे तकिया ते भोजापूर येथे जाणारा रस्ता जलवाहिनीच्या कामाकरिता खोदण्यात आला होता. परंतु खोदकामानंतर त्याची योग्य प्रमाणात दुरुस्ती झालेली नाही. जिल्हा दवाखाना ते साई मंदिर रोड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, चोरीच्या घटना व अन्य असामाजिक तत्त्वांचा वाढत्या प्रमाणामुळे भंडारा शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्ती करावी तसेच नवीन कॅमेरे बसविण्यात यावे, खामतलाव मिस्किन टँक गार्डन तळ्याचे सौंदर्यीकरण करून गार्डनरची नियुक्ती करण्यात यावी, नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या जीर्ण शाळेची दुरुस्ती करून त्या पूर्ण सुरू करण्यात याव्यात, कोरोना प्रादुर्भावामुळे शहरातील प्रत्येक वॉर्डात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात यावी, आदी मागण्यांच्या यात समावेश आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा शाखा तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीने संयुक्त आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.