चांदनी चौकातील घटना : ठाणेदारांनी केले गस्ती पथक तैनात भंडारा : ब्राऊन शुगर विक्री होणाऱ्या घराची माहिती मिळताच शहर पोलिसांनी शहरातील चांदणी चौकातील सोनेकर यांच्या घरी धाड घातली. या धाडीत पोलिसांना चार गॅ्रम वजनाच्या ४७ पुढ्या सापडल्या. त्यानंतर दुचाकीची झडती घेतली असता टूल बॉक्समधूनही काही पुढ्या पोलिसांना सापडल्या. ही कारवाई सोमवारला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.याप्रकरणी शहर पोलिसांनी अनिल सोनेकर (४७) आणि त्याचा मुलगा अमन सोनेकर (२२) या दोघांना अटक केली. सोबतच दुचाकीही जप्त करण्यात आली. तरुणाच्या घरुन ब्राऊन शुगर जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, उपनिरिक्षक वर्मा, काटेखाये, गभने, तायडे, उईके यांनी केली. मंगळवारला या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.अंमली पदार्थाच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी गस्ती पथक तैनात केले आहे. ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वात १ आॅगस्टपासून या गस्ती पथकाने विविध १५ ठिकाणी छापे घालून गुन्हे दाखल केले आहेत. ३० जुलै रोजी प्रीती पटेल या माहिलेचा खून आणि अश्विनी शिंदे व भव्य पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करुन शहरात ब्राउनशुगर, गांजा व अन्य मादक पदार्थांचे अड्डे व अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या माहितीचा शोध घेत मोहीम तीव्र केली आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये दोन प्रकरणात गुन्हे दाखल केले. एका प्रकरणात एका आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली. मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोघांचे रक्तनमूने नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. याशिवाय शहरातील विविध १५ ठिकाणी घातलेल्या छाप्यानंतर संशयास्पद लोकांची चौकशी करण्यात आली, अशी माहिती ठाणेदार हेमंत चांदेवार यांनी दिली.१७ संशयितांची यादीयासंदर्भात चांदेवार म्हणाले, मादक पदार्थांची विक्री करणाऱ्या १७ लोकांची यादी तयार केली आहे. हे पदार्थ कुठून आणले जाते याचा तपास सुरू असून संशयितांची चौकशी सुरू आहे. या मोहीमेसाठी जिल्हा पोलिसांनी एक अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांची चमू गठित केली आहे. भंडारा ठाण्याच्या हद्दीत या कारवाईसाठी सात सदस्यांचे गस्तीपथक तैनात केले आहे. याशिवाय जुगार, सट्टा, क्लब शोधण्यासाठी पाच पथके तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास कुठलाही संकोच न ठेवता पोलिसांना माहिती द्यावी. आपले नाव गोपणीय ठेवण्यात येईल. नागरिकांनी समोर आले पाहिजे. पोलीस प्रशासन तुमच्यासोबत आहे.-हेमंत चांदेवार,पोलीस निरिक्षक, भंडारा.
ब्राऊन शुगर विकणाऱ्या बापलेकाला अटक
By admin | Updated: August 11, 2015 00:44 IST