संगणक चीप ताब्यात : नोटाबंदीनंतर रक्कम बँकेत जमा तुमसर : पाचशे व एक हजार रूपयांच्या नोटा बंदीच्या घोषणेनंतर जुन्या नोटा विविध बँकेत जमा करण्यात आल्या. दरम्यान, नोटामध्ये हेराफेरी केल्याच्या संशयावरून तुमसर शहरातील एका नामांकित बँकेतील संगणक चीप (डाटा) चौकशी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची विश्वसनीय माहिती सूत्राने दिली. नोटा बंदीनंतर नागरिकांनी जुन्या ५०० व एक हजार रूपयांच्या नोटा विविध बँकेत जमा करणे सुरू केले. तुमसर शहरातील एका मोठया बँकेत जुन्या रद्द नोटा मोठया प्रमाणात जमा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नविन नोटा ग्राहकांना वितरीत करण्यात आल्या. दरम्यान, या सर्व प्रकारांची चौकशी व तपासणी बँक प्रशासनाने केली. या अधिकाऱ्यांनी शहरातील एका बँकेची संगणकीय चीप हस्तगत करून चौकशीकरिता ताब्यात घेतली आहे. जुन्या नोटा किती जमा झाल्या त्याचा तपशील त्यात असून त्या व्यवहारांवर संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. नोटाबंदीनंतर या बँकेत किती रक्कम जमा करण्यात आली याची माहिती सध्या घेणे सुरू आहे. या बँकेत खाती किती आहेत, कुठल्या ग्राहकांची खाती आहेत. तथा व्यवहारांचा एका वर्षाचा तपशील चौकशी अधिकाऱ्यांनी मागितला आहे. तुमसर शहरात करदाते किती, कराची आकडेवारीची जुळवाजुळव, प्रमुख व्यावसायिकांची संपत्ती किती? नोटाबंदीनंतर केवळ आठ ते दहा दिवसात शहरातील विविध बँकात कोटयवधी रूपये येथे जमा करण्यात आले. १ जानेवारीनंतर मोठया कारवाईची येथे शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठोस पुराव्यांची अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (तालुका प्रतिनिधी)
नोटाबंदीनंतरच्या हेराफेरीमुळे तुमसरात बँकेची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2016 01:17 IST