भंडारा : महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी व्यसनमुक्त समाज घडविला. यासाठी त्यांनी समाजातील व्यसनाधिन, तणावग्रस्त पीडित जनतेला अंधश्रद्धेतून बाहेर काढत त्यांनी सर्वसामान्यांना दुःख निवारणाचा मार्ग दाखविला. यासोबतच त्यांनी समाजात असलेली अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्तीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यामुळेच आज अनेक कुटुंबे सुखाने जगत आहेत, असे प्रतिपादन खरबी नाका येथील उपसरपंच तथा परमात्मा एकचे सेवक संजय आकरे यांनी केले.
भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथे मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या १००व्या जयंती निमित्त परमात्मा एक सेवक मंडळ शाखा खरबी नाकाच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी कार्यकर्ता गजानन धावडे, उपाध्यक्ष नंदलाल जौंजाळ, सहदेव धावडे, रसपाल कांबळे, दिगंबर धावडे, ओमन मोथरकर, मनोज गिरिपुंजे, मोरेश्वर हटवार, दिपाली आकरे, ममता धांडे, शशिकला मोथरकर, रुक्माबाई धांडे, छबुबाई जौंजाळ, पुष्पकला धावडे, गावातील बालगोपाल, परमात्मा एक सेवक मंडळाचे पदाधिकारी, तसेच इतर सेवक उपस्थित होते. यावेळी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने ओमन मोथरकर यांच्या घरी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना सर्वानुमते अभिवादन करण्यात आले.
यावेळी रसपाल कांबळे यांनी मार्गदर्शनात बाबा जुमदेवजी यांनी तणावग्रस्त पीडित जनतेला दुःख निवारणाचा मार्ग दाखविला, असे सांगून समाजातील अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढण्याचे कामही केले असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांनी बाबा जुमदेवजी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
उपसरपंच संजय आकरे यांनी बाबा जुमदेवजी यांची जयंती सलग दोन वर्षे साजरी करता आली नसली, तरी बाबांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल करीत त्यांचे तत्त्व, शब्द, नियम यांचे पालन करून माणुसकीचा धर्म पुढे नेण्याचे आवाहन केले. जयंती निमित्ताने कोरोनाचे संकट टळावे व पुढील वर्षी १०१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याविषयी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी गजानन ढवळे यांनी बाबा जुमदेवजी यांनी तपश्चर्या करून भगवंताची प्राप्ती केली, तसेच त्यानंतर त्यांनी समाजातील सर्वांना सोबत घेऊन कार्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी सेवकांना भेदभाव न करता कार्य करण्याचे आवाहन केले. ते कार्य आजही सुरू असल्याने, सर्वसामान्यांना या विचारांचा फायदा होत असल्याचे सांगितले. यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्यात आले.