मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : पारंपरिक ज्ञानाला नव्या तंत्राची जोड देत कारल्याची यांत्रिक शेती चुलबंद खोऱ्यातील खोलमारा येथे प्रगतिपथावर आहे. तंत्रशुद्ध व शास्त्रोक्त पद्धतीने कारले पिकाची बाग भरउन्हाळ्यातही हिरवीगार दिसत आहे. दररोज हजारो किलो कारले जिल्ह्यातील बीटीबी येथे विक्रीला जात आहे. शेतकऱ्यांची तळमळ अनुभवण्यासाठी विभागीय कृषी अधिकारी रवींद्र भोसले यांनी आपल्या टीमसह कारले बागेत हजेरी लावली.शेती परवडत नसल्याची ओरड सगळीकडूनच ऐकायला येते. पिकविणे सोपे असले तरी विकणे खूप अडचणीचे असते. परंतु लाखनी तालुक्यातील खोलमारा येथील शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने कारले पीक उत्पादित करीत हमखास भाव व नगदी रुपये देणारी भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी शेतकऱ्यांना फलदायी ठरली. कितीही भाजीपाला खोलमारा येथील शेतकऱ्यांनी पिकविला तरी हमखास विक्रीची व दराची काळजी नसते. शेतकऱ्यांच्या दारात व्यापारी सन्मानाने उभा राहतो. येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रगती पथावर असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आदर्श ठरलेला आहे. सरपंच अमृत मदनकर यांचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्यावतीने शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सन्मानसुद्धा करण्यात आले आहे. शाळा समितीचे अध्यक्ष तथा प्रगतशील शेतकरी दुर्गेश कांबळे यांची कारले पिकाची बाग कृषी अधिकाऱ्यांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. लाखनी तालुक्यातील चुलबंध खोऱ्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. त्यांच्या भाजीपाल्याला व्यापाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्यात पीक उत्पादन वाढीस चालना मिळत आहे. पीक उत्पादनात वाढ व्हावी यासाठी लाखनी तालुका कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. या मार्गदर्शनाचा फायदा पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना झाला असल्याचे सांगण्यात आले.
२०० एकरात भाजीपाल्याचे मळे- खोलमारा येथे सर्वाधिक कारले, चवळी, मिरची, टरबूज, भेंडी आदींचे भरघोष उत्पादन घेतले जाते. संपूर्ण गावाशेजारी कारल्याचे मळे आकर्षक दिसत आहेत. सदाबहार हिरवे कारल्याचे मळे कॅलिफोर्निया, इस्त्राईल देशाची आठवण करून देते. संपूर्ण गाव भाजीपाला उत्पादनात व्यस्त आहे. सुमारे दोनशे एकरात भाजीपाल्याचे सुमार उत्पादन भंडारा जिल्ह्यात प्रशंसनीय आहे. कारले बागेला विभागीय कृषी आयुक्त सोबत उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी सागर ढवळे, मंडळ कृषी अधिकारी हुकुमचंद रामटेके, कृषी पर्यवेक्षक श्रीकांत सपाटे, चंदन मेश्राम कृषी सहाय्यक वि.भा. शिवणकर यांनी हजेरी लावली.
खोलमारा येथील बागायत शेतकऱ्यांचे कृषी क्षेत्रातील अभ्यास व मेहनत निश्चितच प्रशंसनीय आहे. अमृत मदनकर व दुर्गेश कांबळे यांनी गावाला दिलेला आदर्श वाखाणण्याजोगा आहे. यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेत कमी पाण्यात व्यवस्थित नियोजन करून कारखान्याप्रमाणे भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले आहे. संपूर्ण गावच भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे.-रवींद्र भोसले, विभागीय कृषी अधिकारी, नागपूर