वरठी : गीतांजलीच्या देखण्या व गतिमान सौंदर्याची चर्चा अनेक वर्षापासून सुरु आहे. ती अनेक वर्षापासून राणी म्हणून ओळखल्या जाते. यामुळे महिला पुरुष यांच्यासह ती सर्वांच्या आकर्षणाचा भाग बनली होती. तिच्या धावण्याच्या गतीमान पद्धतीमुळे ती सर्वांना हवीहवीशी वाटायची. गीतांजलीसोबत आपण प्रवास करावा व दूरपर्यंत क्षणात मजल मारावी म्हणून चार दशकापासून प्रयत्न सुरु होते. अनेक वर्षांपासून असलेली प्रतिक्षा मागच्या वर्षी संपली व ती भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला येऊ लागली. पण तिला अपेक्षित प्रेक्षक व प्रवासी न मिळाल्यामुळे लवकरच ती भंडारा जिल्ह्याच्या सहवासापासून दूर जाणार असून तिच्या पाठोपाठ समताही येणार नाही.एकंदरीत १ जुलैपासून गीतांजली व समता या दोन्ही रेल्वे गाड्यांचा थांबा भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून बंद होणार आहे. मुंबई हावडा मार्गावर धावणार्या अतिजलद रेल्वे प्रवासी गाड्यांपैकी सर्वात जुनी रेल्वेगाडी म्हणून गीतांजली एक्स्प्रेसचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यात सुरुवातीपासून धावणार्या शेकडो गाड्या आहेत. पण सर्वांना सहज लक्षात असलेले व आकर्षण असलेली एकमेव नाव येते ते म्हणजे गीतांजलीचे. थांबा नसलेल्या गावावरून भुर्रकन निघून जाणे व प्रवाशांना पटकन त्यांच्या ठिकाणावर पोहचविण्याच्या तिच्या सवयीमुळे प्रवाशांना या गाडीचे विशेष आकर्षण होते. गोंदियापासून ते अकोलापर्यंत नियमीत प्रवास करणारे व विविध शासकीय कामानिमित्त जाणार्याकरिता व विद्यार्थ्यांंकरिता अत्यंत सोयीची गाडी होती.चार दशकांपासून भंडारा रोड रेल्वे स्थानकावर सदर गाडीचा थांबा देण्याची मागणी सुरु होती. याकरिता शेकडो निवेदन व अनेक संघटनांनी पुढाकार घेतला होता. पण ही गाडी भंडारा रोड रेल्वेस्थानकावर थांबविण्याची ताकद उभी झाली नाही. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने गतवर्षी या गाडीचा थांबा भंडारा रोड रेल्वे स्थानकावर मिळाला. या करिता प्रफुल पटेल यांना आपले वजन वापरले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरु झालेली गाडी लवकरच बंद होणार असल्याचे पत्र स्थानिक रेल्वे विभागाला मिळाले आहे. गीतांजलीपाठोपाठ आता समता एक्स्प्रेसही १ जुलैपासून बंद होणार आहे. थांबा बंद करण्यासाठी रेल्वे विभागाकडून ठोस असे कारण दिलेले नाही. पण हावडापासून सुसाट वेगाने धडधड धावणारी गीतांजली वर एक वर्षापूर्वी भंडारा रोड रेल्वे स्थानकावर लागणारे ब्रेक आता १ जुलैपासून लागणार नाहीत. गीतांजली पुन्हा नेहमीप्रमाणे भुर्रकन जिल्हावासीयांची चेष्टा करून निघून जाईल. याबरोबर अनेक वर्षापासून विशाखापट्टणम् ते हजरत निजाउद्दीन मार्गावर धावणारी समता एक्स्प्रेसही बंद होणार आहे. दिल्लीला जाणारी ही एकमेव गाडी आठवड्यातून पाच दिवस धावत होती.गीतांजली व समता एक्स्प्रेस या प्रवासी गाड्या बंद होणार असल्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. (वार्ताहर)
‘गीतांजली’चा सहवास हिरावणार
By admin | Updated: June 3, 2014 23:52 IST