दवडीपार-कोरंभी मार्गाची दैनावस्था : बंद मार्गावरून सुरू झाली वाहतूकभंडारा : गाव तिथ रस्ता, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र, गोसेखुर्द प्रकल्पामुळे दवडीपार-कोरंभी मार्गावरील पुलावरून बाराही महिने पाणी राहत असते. येथून मार्गक्रमण करताना नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत होता. याची जिल्हा परिषद सदस्य जया यशवंत सोनकुसरे यांनी दखल घेत बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुलावर मुरूमाचे भरण भरले. आता या मार्गावरून वाहतूक सुरू झाली असून ग्रामस्थांसाठी 'जया' देवदूत ठरल्या आहेत.राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्दमुळे जिल्ह्यातील अनेक गावांचे पूनर्रवसन झाले. यातीलच दवडीपार या गावाला अंशता बाधीताचा फटका बसला आहे. दवडीपारवासीयांचा शेतीसोबत दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा आहे. या गावाला चारही बाजूंनी मोठे नाले आहेत. त्यामुळे गाव पाण्याने वेढलेले असते. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी अडविल्याने गावाला जोडलेले दोन मार्ग पाण्याखाली आहेत. दवडीपार-कवळशी, दवडीपार-कोरंभी हे मार्ग पाण्याखाली राहतात. तर दवडीपार-बेला रस्ता अतीवृष्टीमुळे बंद पडतो. गोसे पूनर्वसन विभागाने या तिन्ही मार्गाची उंची वाढवून मार्गावर पुल बांधकामाचा प्रस्ताव पाठविला. मात्र, फाईल शासनदरबारी धूळखात पडली आहे. दवडीपार-कोरंभी मार्गावरील नाल्यावरून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांना नाल्यापलीकडे शेती किंवा अन्य कामांसाठी जाताना जीव मुठीत घेवून जावे लागत होते. याची जाणीव शिवसेनेचे पंचायत समिती उपसभापती ललीत बोंद्रे, यशवंत टिचकुले यांनी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांना करून दिली. सोनकुसरे यांनी घटनास्थळाला भेट देवून कार्यकारी अभियंता अनिल खडसे, उपअभियंता शेंडे व गोसे अधिकाऱ्यांना पुलावर मुरूमाचा भरणा करण्याचे सुचविले. अधिकाऱ्यांनी पुलावर पाच ते सहा फुट मुरूमाचे भरण भरून मागील दोन वर्षांपासून बंद असलेला मार्ग पूर्ववत सुरू केला. नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने त्या ग्रामस्थांसाठी देवदूत ठरल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
शेकडो ग्रामस्थांसाठी ‘त्या’ ठरल्या ‘देवदूत’
By admin | Updated: December 14, 2015 00:34 IST