विजेत्याचा सत्कार : लोकमत संस्कार मोती स्पर्धाभंडारा : लोकमत संस्कार मोती स्पर्धेत भंडारा येथील सेंट पिटर्स शाळेचा विद्यार्थी सिद्धार्थ शैलेंद्र मैने याने 'नागपूर ते दिल्ली' असा प्रवास विमानाने करून हवाई सफरीचा आनंद लुटला. लोकमत समुहातर्फे आयोजित या स्पर्धेत विदर्भातील १२ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. शालेय विद्यार्थ्यांचे सुप्त गुण वाढावे यासाठी लोकमत परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत असते. लोकमत संस्कार मोती २०१४-१५ मध्ये शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका स्पर्धकाला नागपूर-दिल्ली हवाई सफरसाठी निवड करायची होती. त्याअंतर्गत सेंट पिटर्स शाळेचा विद्यार्थी सिद्धार्थ मैने याची या हवाई सफरसाठी निवड झाली. गुरूवारी सकाळी ८.३० वाजता विमानाने नागपूरहून दिल्ली येथे विजयी विद्यार्थ्यांची चमू नेण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत लोकमतचे सहायक वितरण व्यवस्थापक संतोष कळसकर (यवतमाळ) उपस्थित होते. दिल्ली येथे पोहचताच या सर्व विद्यार्थ्यांना इंडिया गेट, इंडियन नेवी परिसर, संसद परिसर, रेल्वे संग्रहालय दाखविण्यात आले. तसेच मंत्रालय परिसरात रक्षामंत्री मनोहर पर्रीेकर यांच्याशी भेट घेण्यात आली. त्यानंतर विमानाने दिल्ली ते नागपूर असा प्रवास करून रात्री ९.३० वाजता या विद्यार्थ्यांना परत आणण्यात आले. दरम्यान आज शुक्रवारी सेंट पिटर्स शाळेत सिद्धार्थ मैने याचा पुष्पगुच्छ देवून त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या सिस्टर दिपा, सहायक शिक्षिका अपेक्षा कठाळे, जिल्हा कार्यालय प्रमुख मोहन धवड, वितरण अधिकारी विजय बन्सोड, सिद्धार्थची आई ज्योति व बहिण दिव्यानी मैने उपस्थित होते. लोकमतच्या या उपक्रमाने सिद्धार्थला एक नवीन अनुभव मिळाला आहे. (प्रतिनिधी)
अन् सिद्धार्थने घेतला हवाई सफरीचा आनंद
By admin | Updated: June 27, 2015 00:55 IST