फटका डॉक्टरांच्या संपाचा : खासगी रुग्णालय हाऊसफुल्ल तुमसर : प्रसूतीकरिता तुमसर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आलेली एक महिला उपचाराअभावी तडफडत होती. उपचाराकरिता तिचे कुटुंबीय रुग्णालय प्रशासनाची विनवणी करीत होते. परंतु संपकर्त्या डॉक्टरांना पाझर फुटला नाही. एक महिला वेदनेने तडफडत असल्याची माहिती होताच स्थानिक पत्रकारांनी पुढाकार घेऊन तिला खाजगी रुग्णालयात दाखल करून सामाजिक बांधिलकी जोपासली.सिहोरा येथील कीर्ती मनोहर कुंभरे (२२) या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुंभरे कुटुंबीयांनी तिला तुमसर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ११ वाजता आणले. येथे वैद्यकीय अधिकारी संपावर असल्यामुळे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तुमसरच्या रुग्णालय प्रशासनाने सांगितले. भंडाऱ्यातही डॉक्टर संपावर असल्याची माहिती कुंभरे कुटुंबीयांना मिळाल्यामुळे तिथे नेऊन कसे होणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. हातात पैसा नाही, खाजगी रुग्णालयात कसे घेऊन जायचे, असा प्रश्न त्यांना पडला होता. कीर्तीच्या वेदना मिनिटागणिक वाढत होत्या. त्याही परिस्थितीत कुंभरे कुटुंबीयांनी केलेल्या दयायाचना व्यर्थ ठरल्या.दरम्यान, रुग्णालयात वृत्त संकलन करण्याकरिता स्थानिक पत्रकार पोहोचले असता त्यांना कीर्ती वेदनेने किंचाळतांना दिसली. या पत्रकारांनी क्षणाचाही विलंब न करता एका खाजगी रुग्णवाहिकेला बोलावून किर्तीला डॉ.मिनल भुरे यांच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. तिचा संपूर्ण खर्च स्थानिक पत्रकार तथा पंचायत समितीचे सभापती कलाम शेख, राष्ट्रवादी युवती मंचच्या कल्याणी भुरे, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुनिल पारधी करणार आहेत.चार कंत्राटी डॉक्टरांविरुद्ध कारवाई११ महिन्याच्या करारावर नियुक्त डॉक्टर्स संपात सहभागी झाले होते. शासनाने त्यांना वारंवार कामावर रूजू होण्याचे आदेश दिल्यावरही ते रूजू झाले नाहीत. त्यामुळे वैद्यकीय सेवा कोलमडली आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी तुमसर येथील चार कंत्राटी डॉक्टरांवर बडतर्फीची कारवाई केली. शहरातील सर्वच खाजगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसत असून शासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी रुग्णांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
अन् कीर्तीकरिता ‘त्यांनी’ घेतला पुढाकार
By admin | Updated: July 7, 2014 23:24 IST