भंडारा : वेळ सकाळी ११.३० ची. भंडारा आगारातून भंडारा-अकोला एसटी क्रमांक एमएच ४० वाय ५२७० घेवून चालकासह भंडारा बसस्थानकात पोहोचले. वाहकाने चौकशी कक्षात वाहनासंबंधी माहिती दिली. आणि एसटीकडे जात असताना वाटेतच वाहक कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयविदारक घटना आज सकाळी ११.३५ वाजताच्या सुमारास भंडारा बसस्थानकात घडली. केशव लहानुजी जौंजाळ (५४) रा. खरबी असे मृत वाहकाचे नाव आहे. या घटनेने बस स्थानक परिसरात गंभीर वातावरण निर्माण झाले. अन्य सहकारी कर्मचाऱ्यांनी जौंजाळ यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित करण्यात आले. आकस्मिक घडलेल्या या प्रकारामुळे जौंजाळ कुटूंबियावर दु:खाचे डोंगर कोसळले. वैद्यकीय अहवालानंतर त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट होणार आहे. हृदयविकाराने त्यांचे निधन झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. (प्रतिनिधी)जुन्या वाहकांना लांब पल्ल्यांचा शेड्यूलबस स्थानकात प्राण गेलेल्या केशव जौंजाळ यांचे वय (५४) वर्षांचे आहे. त्यांना भंडारा- अकोला या शेड्यूलवर पाठविण्यात येत होते. जौंजाळ यांच्या मृत्युनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. जुन्या वाहकांना लांब पल्ल्यांच्या शेड्युलिंगवर पाठविले जाते. नवीन वाहकांना याबाबतची जबाबदारी जास्त प्रमाणात दिली जात नाही. सुटी ही कमी प्रमाणात असल्याने वाहक व चालकांची मानसिक व शारीरिक स्थितीवर परिणाम जाणवत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. शेड्यूलिंग लावण्यात भेद केला जातो, असेही नाव न सांगण्याच्या अटीवर वाहकांनी सांगितले.
अन् वाहकाने सोडला बसस्थानकात जीव
By admin | Updated: April 24, 2015 00:26 IST