लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : दुरुस्तीची प्रतीक्षालाखनी : तालुक्यातील आलेसूर, बोरगाव, राजेगाव रस्त्यावरचे डांबरीकरण पूर्ण उखडलेले असून रस्त्यावरील दगड बाहेर आल्याने अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे.तालुक्यातील आलेसूर- बोरगाव मार्गावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडलेले आहे. रस्ता दुरुस्ती मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केले आहे. आलेसूर, बोरगाव, मासलमेटा हा मार्ग जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. गत १० वर्षापासून रस्त्यावर पॅचिंगचे काम करण्यात आले नाही. रस्त्यावर मोरी बांधकामाची आवश्यकता आहे. रस्त्यावरील डांबर निघाल्याने व निकृष्ट प्रतीचे काम कंत्राटदाराने केल्याने रस्त्यातील दगड व गिट्टी बाहेर निघाले आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनाला समोरे जावे लागते. मासलमेटा, बोरगाव, आलेसूर येथील लोकांना सदर रस्त्याचा उपयोग राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव, मानेगाव, लाखनी येथे जाण्यासाठी करावा लागतो. ग्रामपंचायत बोरगावने आमदार बाळा काशीवार यांच्याकडे मागील दोन वर्षापासून रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. गावकऱ्यांनी बोरगावचे उपसरपंच नेपाल मेश्राम यांना रस्ता दुरुस्तीबाबत शासनाची भूमिका काय आहे याबाबत प्रश्न विचारले आहे. रस्ता दुरुस्त झाला नाही तर नेत्यांना गावबंदी करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात अतिवृष्टीमुळे रस्त्यावर गड्डे पडले आहेत व डांबर वाहून गेले आहे. तसेच कामाचा दर्जा सुमार असल्यामुळे डांबरीकरण व खडीकरणाची काय गरज होती असा प्रश्न जनतेद्वारे विचारले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे येणाऱ्या बोरगाव आलेसूर, मासलमेटा मार्गाचे डांबरीकरण पूर्णपणे उखडलेले आहे. रस्त्याची दुरुस्ती व पुन:निर्माणाचे काम नियोजनात घेण्यात येत आहे. अभियंत्याकडे पाठपुरावा करून रस्ता दुरुस्तीकरणाबाबत भर दिला जाणार आहे. - ज्ञानेश्वर रहांगडालेजि.प. सदस्य, लाखोरी क्षेत्र.
आलेसूर-बोरगाव रस्ता देत आहे अपघाताला आमंत्रण
By admin | Updated: February 8, 2016 00:45 IST