सीबीएसई दहावी परीक्षेत ९०.२० टक्के गुण : मेहनत व आत्मविश्वासाची फलश्रृतीदिनेश भुरे । लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : जन्मत: स्पाईनल स्कोलियासीस या दुर्धर आजाराने ग्रस्त असतांना अनेक शस्त्रक्रियांचा सामना करुन ही निर्माण झालेल्या शारीरिक व्यंगावर दुर्दम्य इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या बळावर आणि आई वडील व प्राचार्या यांच्या प्रेरणादायी स्फूर्तीने सकारात्मक प्रेरणा घेत जान्हवी विरमाचेननी या गुणवंत विद्यार्थीनीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परिक्षेत ९०.२० टक्के गुण घेत आजारालाही मागे टाकले. शारीरिक प्रकृती साथ देत नसतानाही तिने यशाला गवसणी घालण्याची किमया केली आहे.ती भंडारा जिल्ह्यात सीबीएसई माध्यमिक शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या उमरी येथील महर्षी विद्या मंदिरची विद्यार्थिनी आहे. मुळची नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील एका साधारण शेतकरी कुटुंबातील जान्हवी वरीमाचेननी हिला जन्मजात स्पाईनल स्कोलियासिस या असाध्य आजाराची लागण होती. वयानुसार आजारही बळावत गेला. ती आठव्या वर्गात असताना तीला तामिलनाडू राज्यातील कोयंबतूर शहरात उपचाराकरिता नेण्यात आले. वैद्यकिय चमूने तपासणी करुन तीन टप्प्यामध्ये शस्त्रक्रिया करण्याचे सुचविले. त्यानुसार आठव्या वर्गात असतानाच जान्हवीच्या दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दरम्यान आजारपणामुळे तिच्या डाव्या पायाला लकवा झाला. तो बरा व्हायला, तीन महिने लागले. तिसरी शस्त्रक्रिया नवव्या वर्गात असताना करण्यात आली. यामुळे आठव्या वर्गात असताना पूर्ण वर्षभर व नवव्या वर्गात असताना प्रथम सत्रात शाळेत जाऊ शकली नाही. महर्षि विद्या मंदिरच्या प्राचार्या श्रृती ओहळे यांच्या मार्गदर्शनानुसार तिने घरीच अभ्यास करुन दोन्ही वर्ग उत्तीर्ण केले. आजार असातनाही आई वडील यांची प्रेरणादायी इच्छाशक्ती या कामी आली. स्पाइनल स्कोलियासिस हा दुर्धर आजार मानला जातो. या आजारपणामुळ तिची शारीरिक स्थिती अत्यंत नाजूक होत गेली. ती दप्तर सुध्दा पाठीवर घेवू शकत नव्हती. अधिक वेळ बसू शकत नव्हती. नववीत असताना शाळेत जाणाच्या आग्रह धरला. जान्हवीची परिस्थिती पाहता प्राचार्या श्रृती आहळे यांनी तिची विशेष काळजी घेतल्याचा आवर्जुन उल्लेख तिच्या पालकांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना केला. वर्गात पूर्ण वेळ बसू शकत नसल्याने दुपार सुटीनंतर शाळेत स्वतंत्र अभ्यासिका निर्माण करुन देण्यात आली. शिकविला गेलेला भाग तिला तिचे वर्गमित्र आणुन दयायचे जर ती शाळेत जावू शकली नाही तर नोटस् तीला घरी अभ्यासाकरिता पाठविल्या जायच्या.शाळेत दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या दहा दिवसीय निवासी अभ्यास शिबिराचा तिला फायदा झाला. चिकाटी व मेहनतीने तिच्या यशाला मूर्त रुप मिळाले. जान्हवीच्या यशात बस वाहकापासून वर्गमित्र, शिक्षिका, प्राचार्या, आईवडील, मोठी बहीण यांचा सकारात्मक सहभाग राहिला. दुर्धर आजार असतानाही तिच्या चेहऱ्यावरील हास्य जिद्दीची प्रचिती देते.
दुर्धर आजारावर मात करुन ‘जान्हवी’ने गाठले शिखर
By admin | Updated: June 12, 2017 00:29 IST