साकोली : गडेगाव लाकूड आगार येथे मागील २५ दिवसांपासुन उपचार घेत असलेला जखमी बिबट आज उपचारमुक्त झाला आहे. त्याच्या जखमा भरलेल्या आहेत. त्यामुळे या बिबटाला आता जंगलात किंवा प्राणी संग्रहालयात सोडता येवू शकते असा अहवाल पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी काल दि. ३० रोजी वनविभागाला दिला आहे. त्यामुळे आता या विषयाला सोडण्यासाठी आदेशाची प्रतिक्षा आहे. या बिबट्याची कडेकोट सुरक्षा कायम आहे.साकोली तालुक्यातील जांभळी (खांबा) येथील वृध्द महिलेला ठार करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने दि. ५ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले. त्यानंतर या बिबट्याला रात्रीच गडेगाव आगार येथे आणण्यात आले. तेव्हापासून या बिबट्यावर पिंजऱ्यातच औषधोपचार सुरु असून वनविभागाच्या देखरेखीत आहे. बऱ्याच दिवसापासून एकाच ठिकाणी जेरबंद असल्याने या बिबट्याजवळ कुणी गेल्यास तो चवताळून पिंजऱ्यावर डोके आढळायचा. यात आधीच पायाने जखमी असलेल्या बिबट्याच्या डोक्यानाही जखम झाली. ही गंभीर स्वरुपाची असल्याने त्याला इतरत्र हलविणे अडचणीचे झाले होते.हा बिबट जेरबदं होण्याआधीच पायाला दुखापत असल्याने त्याची तीन नखे गळून पडली होती. त्याठिकाणी पु झाला होता. त्यामुळे त्याला जंगलात भक्ष्य मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे त्याने आपला मोर्चा गावाकडे वळविला असावा असा वनअधिकाऱ्याचा कयास आहे. या बिबट्याला पकडल्यानंतर त्याच्या पायाची इजा लक्षात आली व पायावरील जखमेवर औषधोपचार करीत असतानाच पुन्हा डोक्यावर झालेल्या जखमेमुळे वनअधिकारी व कर्मचाऱ्याचीही झोप उडाली होती. या दोन्ही जखमा दुरुस्त होत नाही तोपर्यंत त्याचा सुरक्षेची मोठी जबाबदारी वनकर्मचाऱ्याकडे होती. (तालुका प्रतिनिधी)
२५ दिवसांच्या उपचारानंतर बिबट झाला बरा !
By admin | Updated: December 1, 2014 22:48 IST