उसर्रा : आधी प्रेम व नंतर सात जन्माच्या बेड्यात अडकून आपला संसार करुन जीवनमान उंचावे असा बेत धरुन दोन स्वजातीय प्रेमीयुगुलाचे तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने लग्न लावून दिले.आशिष देवीलाल आग्रे (२९) रा. सिहरी व दीपाली दुधराम वक्कलकार (१८) रा. नागपूर असे नवविवाहित प्रेमीयुगुलाचे नाव आहे. आशिष आग्रे नागपूरला कामावर आहे. कामावर असतानाच त्याचे दीपाली वक्कलवारसोबत प्रेमसूत जुळले. लग्नाच्या आणाभाका झाल्या. पण दीपालीच्या आई-वडिलांनी या लग्नास नकार दिला. मुलीच्या नातेवाईकांनी लग्नाला कडाडून विरोध केला. तेव्हा प्रेमीयुगुलाने मुलाच्या स्वगावी सिहरी येथील तंटामुक्त समितीकडे धाव घेतली. येथील क्रियाशील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ईस्तारी बेलेकर व ग्रामपंचायत सदस्य महेश पराते यांच्या पुढाकाराने १ आॅक्टोबर २०१५ रात्री १० वाजता सिहरी येथील हनुमान मंदिरासमोर दोन्ही प्रेमीयुगुलांचे विवाह करण्यात आले. तंटामुक्त समितीने बांधिलकी जोपासली असून सर्व स्तरावरुन तंटामुक्त ग्राम समितीचा अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. तंटामुक्त समितीचे सदस्य तथा गावातील नागरिक, महिला सदर विवाहाला हजर होते. ईस्तारी बेलेकर महेश पराते, सुमन बघेले, सुरेखा बेलेकर, माजी सरपंच संजय गौरे, भगवान बच्छेरे, बालाराम वैद्य, दीनदयाल टेंभरे, छबीलाल बघेले, रामू बघेले, निलकंठ शरणागते, ललीता शरणागते, खेलन पारधी, पोलीस पाटील करुणा गौरे, मारोतराव बघेले, पारधी, बेलेकर, सुमन सेलोकर, वैद्य आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)
तंटामुक्तीच्या पुढाकाराने प्रेमीयुगूल विवाहबद्ध
By admin | Updated: October 3, 2015 00:35 IST