सोमवारी १५३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यात ६, तुमसर आणि लाखनी येथे प्रत्येकी २ असे १० रुग्ण आढळून आले, तर मोहाडी, पवनी, साकोली आणि लाखांदूर तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २३ हजार ३९७ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांची तपासणी करण्यात आली. त्यात १३ हजार ३८४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी १२ हजार ९६१ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सोमवारी कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. आता मृतांची संख्या २२६ आहे. सध्या जिल्ह्यात ९७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के तर मृत्युदर २.४४ टक्के आहे.
गत जानेवारी महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट येत असल्याचे दिसत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात १२ हजार ३५५ कोरोना रुग्ण आढळले होते, तर २९१ जणांचा मृत्यू झाला होता. संक्रमणाचा दर ११.०७ टक्के होता. १ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत १ हजार १० रुग्ण आढळले, तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असले, तरी भंडारा जिल्ह्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यास प्रशासनाला यश आले. नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे.