एसडीओंची कारवाई : रेतीघाटावरुन नियमबाह्य रेतीचा उपसा तुमसर : तुमसर तथा मोहाडी तालुक्यातील विविध रेती घाटावरुन क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहतूक सर्रास सुरु आहे. तुमसरच्या उपविभागीय अधिकारी व त्यांच्या पथकाने आठ ओव्हरलोड ट्रकवर कारवाई केली. सदर ट्रक तुमसर पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत. तुमसर व मोहाडी तालुक्यात महसुल विभागाने रेती घाट लिलाव केले आहेत. रेती घाटवरुन रेती वाहतूकीच नियम महसूल प्रशासनाने घालून दिले असून तसे कडक निर्देश आहेत. याव्यतिरिक्त तुमसर व मोहाडी तालुक्यातील रेती घाटावरुन सर्रास नियमबाह्य ओव्हरलोड रेतीची वाहतूक सुरु आहे. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व त्यांच्या पथकाने ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर नियमानुसार कारवाई केली हे ट्रक सध्या तुमसर पोलीस ठाण्यात उभे आहेत. महसूल अधिकारी, कर्मचारी व पोलिसांची प्रचंड मोठी फौज कर्तव्यावर असतांनी ओव्हरलोड रेती वाहतूक कशी सुरु आहे, हा प्रश्न येथे उपस्थित होतो. तुमसर व मोहाडी तालुक्यातील वैनगंगा पात्रातील रेतीघाट मोठे आहेत. रेती घाटातून जेसीबी, पोकलँड मशीनद्वारे रेतीचे उत्खनन सध्या सुरु आहे. महसूल विभागाच्या नियमानुसार मशीनने रेती उत्खनन करता येत नाही. नदी पात्रात सीमांकन जरी करण्यात आले तरी सुध्दा सीमांकनाबाहेरुन रेती उत्खनन सुरु असल्याची माहिती आहे. काही रेती घाटावर सुर्यास्तानंतर रेती उत्खनन सुरु असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
ओव्हरलोडेड रेती ट्रकांवर कारवाई
By admin | Updated: December 23, 2016 00:32 IST