तुमसर : तालुक्यातील गोबरवाही रेल्वे स्थानकावर बनावट कागदपत्रांचा आधारावर नोकरी बळकाविणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली. ही कारवाई गोंदिया रेल्वे पोलिसांनी आज दि. १७ डिसेंबरला केली. नागपूर येथील जयताळा परिसरातील एकात्मता नगर येथील सनम शरद बोरकर (२१) असे अटकेत असलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने गोबरवाही रेल्वे स्थानकावर चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून रुजू होता यावे यासाठी दक्षिण पुर्व मध्य रेल्वे नागपूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बनावट स्वाक्षरी व कागदपत्रांच्या आधारावर रुजूपत्र बनविले. या आदेशपत्रावरुन तो गोबरवाही रेल्वे स्थानकावर १५ नोव्हेंबर २०१४ ला चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून रुजू झाला.महिना अखेरीस गोबरवाही रेल्वे स्थानकाचे अधिक्षकांनी त्याच्या वेतनासंबंधात दक्षीण मध्य पुर्व रेल्वेच्या नागपूर कार्यालयाला माहिती पाठविण्याच्या संदर्भात आदेशपत्र मागितले. सदर कागदपत्र नागपूर विभागीय कार्यालयात पाठविले असता. ते बनावट असल्याचे लक्षात आले. याची चौकशी करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने दोन समित्या गठीत करुन चौकशी केली असता नियुक्तीपत्र बनावट असल्याचे आढळून आले. याप्रकरणी समितीच्या अहवालावरुन गोबरवाही पोलिसात सनम विरुध्द तक्रार दाखल करुन भादंवि ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी गोंदिया रेल्वे पोलिसांनी सनमला अटक केली असून चौकशी सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)
बनावट कागदपत्रांवर नोकरी बळकावली
By admin | Updated: December 18, 2014 00:31 IST