मोरगाववासीयांचा एल्गार : अहवाल सादर, परवानाधारक कारवाईस पात्र लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मोरगाव येथील रास्तभाव दुकानदार व किरकोळ केरोसिन परवाना धारकाने धान्य व केरोसीनची अफरातफर केली. यासंबंधी चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठवा व इतर दोन मागण्या घेवून मोरगाव येथील गावकऱ्यांनी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्च्यानंतर तहसिलदारांनी डी. वन नुसार पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका देण्यात येतील. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अहवाल पाठविण्यात आल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.मोरगाव येथील रास्तभाव दुकानदार व किरकोळ केरोसीनपरवानाधारक मनिषा रामटेके यांनी धान्य व केरोसीनची अफरातफर केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. याबाबत पाच वर्षाचे रेकार्ड हस्तगत करुन १०० टक्के शिधापत्रिकाधारकांचे बयान नोंदविण्यात आले होते. तत्पूर्वी धान्य व केरोसीनचे परवाना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निलंबित केले होते. पाच वर्षाचा रेकार्ड सदर परवानाधारकाला सादर करण्याचे निर्देश केले होते. पण, महिना उलटूनही परवानाधारकाने कोणतेही रेकार्ड उपलब्ध करुन दिले नाही. परवानाधारांनी प्रत्यक्षात किती धान्य व केरोसीन वाटप केले याबाबत शिधापत्रिका धारकांचे जाब विचारुन लेखी बयान घेण्यात आले होते. त्यात अंत्योदय योजनेमध्ये एकूण १९ प्रत्यक्ष शिधापत्रिका असून त्यामध्ये ७३ लोकसंख्या आढळून आली. बीपीएल योजनेमध्ये एकूण ५० शिधापत्रिका असून २२७ लोकसंख्या प्रत्यक्षात असल्याचे निदर्शनास आले. अन्नसुरक्षा योजनेत एकूण १२ शिधापत्रिका असून त्यामध्ये ५४ लोकसंख्या प्रत्यक्षात आढळून आली. योजनेनिहाय शिधापत्रिकांची माहिती गोळा केली असता मोरगाव येथे १४१ शिधापत्रिका व ५९३ लोकसंख्या असल्याचे दिसून आले. अहवाल पाठविण्यास विलंब का होत आहे हा ठपका गावकऱ्यांनी तहलिसदार त्यांच्यावर ठेवला. त्यामुळे मोरगाववासीयांनी तहसिल कचेरीवर मोर्चा काढला होता. गुरुवार बाजार येथून काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व श्रीधर भूते, तुलाराम हारगुडे, पंढरी अतकरी, गंगाधर भूते, सुधाकर बुरडे, उमेश बुराडे, कैलास हारगुडे, गोपाल शहारे, संतोष हारगुडे, बंसीलाल हारगुडे, रामकृष्ण कांबळे, सहादेव हारगुडे, दिनेश भोयर, मंदा मारबते, सुषमा भुते, नंदा भुते यांनी केले.
डी-वन नुसार लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका बनवणार
By admin | Updated: June 13, 2017 00:15 IST