आरोग्य यंत्रणा कुचकामी : खासगी रुग्णालयात रूग्णांची गर्दी भंडारा : वातावरणातील बदलामुळे काही दिवसांपासून तालुक्यात साथीच्या आजाराची लागण झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव आर्थिक भुर्दंडसहन करत खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात पावसाचा पत्ता नाही. त्यातच दमट वातावरण, प्रचंड उकाडा आणि सातत्याने वातावरणात बदल होत आहे. याच नैसर्गिक परिस्थितीमुळे वेगवेगळे आजारही तोंड वर काढत आहे. खोकला, सर्दी, ताप, मलेरिया, अतिसार, हगवण आदी आजारांनी अबालवृद्ध त्रस्त झाले आहे. तालुक्यातील मुळावा, थेरडी, सोनदाबी, विडूळ, ढाणकी, कोरटा या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ उपकेंद्रांमध्ये रुग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. भंडारासह तुसमर, साकोली, लाखनी, पवनी शहरातील खासगी रुग्णालयामध्ये व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विविध आजारांवर उपचार करून घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज ४०० पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती आहे. सर्वाधिक रुग्ण सर्दी, खोकला व तापाचे आहे. लहान मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्येही सर्दी, ताप, खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. रुग्णालयात काही प्रमाणात निमोनियाचेही रुग्ण आढळून आले. बहुतांश रुग्ण हे ‘व्हायरल फिवर’चे असल्याचे दिसून आले. तालुक्यात पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे काही भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे. ग्रामीण भागात रस्त्यालगत व गटारामध्ये पाणी साचल्याने नागरिकांकडे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. उल्लेखनीय म्हणजे वृद्ध व लहान मुलांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या पावसाअभावी सर्वत्र दमट वातावरण दिसून येत आहे. दूषित पाण्यामुळे विविध आजार उद्भवत आहे. तालुक्यातील अनेक गावात विहिरीमध्ये पाणी साचले आहे. परंतु या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकलीच जात नाही. त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होतो. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे याकडे कोणतेही लक्ष नाही. सर्वसामान्य नगारिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
साथीच्या आजारांचे थैमान
By admin | Updated: July 15, 2015 00:41 IST