चुरशीच्या लढती : जि.प.साठी ३१० तर पं.स.साठी ५३६ उमेदवारभंडारा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये एकूण ८४६ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. सात जिल्हा परिषद गटात ३१० तर १४ पंचायत समिती गणात ५३६ उमेदवार निवडणूक लढत आहेत. सर्वच १०४ गट आणि गणात चुरशीच्या लढती होणार आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या चार प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. अपक्षांची संख्याही अधिक आहे. शिवसेनेने काही ठिकाणी उमेदवार उभे केले नसून अन्य पक्षासह राजकीय पक्षाचे चारशे उमेदवार रिंगणात असले तरी त्याहून अधिक म्हणजे ४५० च्यावर उमेदवार हे अपक्ष आहेत. राजकीय पक्षांना निवडणुकीला सामोरे जाताना अपक्षांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा तालुक्यातील १० जिल्हा परिषद गटातून ८५ तर २० पंचायत समिती गणातून १२८ उमेदवार, पवनी तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गटातून ३८ तर १४ पंचायत समिती गणातून ८१ उमेदवार रिंगणात आहेत. तुमसर तालुक्यातील १० जिल्हा परिषद गटातून ५७ तर २० पंचायत समिती गणातून ९६ उमेदवार, मोहाडी तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गटातून ३४ तर १४ पंचायत समिती गणातून ६५ उमेदवार रिंगणात आहेत. साकोली तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटातून २८ तर १२ पंचायत समिती गणातून ५५ उमेदवार, लाखनी तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटातून ३१ तर १२ पंचायत समिती गणातून ४७ उमेदवार, लाखांदूर तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटातून ३७ तर १२ पंचायत समिती गणातून ६४ उमेदवार रिंगणात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
८४६ उमेदवार रिंगणात
By admin | Updated: June 30, 2015 00:42 IST